Devendra Fadnavis ( Marathi News ) : पावसाळी अधिवेशात राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही मोठी योजना जाहीर केली. विधानसभेपूर्वी ही योजना जाहीर केल्यामुळे या योजनेची चर्चा सुरू आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. दरम्यान, या योजनेवर विरोधकांकडून टीकाही सुरू आहेत. तर दुसरीकडे आज राज्य सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. आज साताऱ्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
ठाणे : २ चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; हरभजन संतापला, CM शिंदेंना टॅग करत म्हणाला...
"माझ्या बहीणी जेव्हा मला देवाभाऊ म्हणतात तेव्हा मला जास्त आवडतं. जर विकसित भारत घडवायचं असेल तर महिलांना देशाच्या मुख्यधारेत आणल्याशिवाय हे होऊ शकतं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे. जोपर्यंत महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत हे होऊ शकत नाही. आता हळूहळू महिलांच्या जीवनात परिणाम होत आहे. आता पुढच्या काळात विधानसभा आणि लोकसभेत महिला प्रतिनिधी निवडून जाणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेत १०० महिला आपल्याला दिसतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"ज्यावेळी आम्ही एसटी तिकीटाचा निर्णय घेतला तेव्हा विरोधक आमच्यावर टीका करु लागले, पण एसटी यामुळे फायद्यात आली आहे. आज आपण महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. विरोधक या योजनेच्या विरोधात बोलत आहेत. याविरोधात कोर्टात गेले, या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. हे सावत्र भाऊ तुम्हाला आतापर्यंत काही दिलं नाही, यापुढेही काही दिलं नाही, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
'योजना कधीच बंद होणार नाही'
"तुमच्या आशिर्वादाने या सरकारने ३१ मार्चपर्यंत या योजनेसाठी पैसे ठेवले आहेत. पुढच्या काही दिवसात पुन्हा आपलेच सरकार येणार पुन्हा आम्ही या योजनेसाठी पैसे ठेवणार आहे. जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. काहीजण म्हणतात पंधराशे रुपयात काय होणार आहे? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना या योजनेच काय कळणार आहे. हे लोक हॉटेलमध्ये २ हजारांची टीप देणाऱ्यांना पंधराशे रुपयांची किंमत समजत नाही. आमची ती भगिनी महिन्याच्या शेवटी हिशोब करते तेव्हा त्यांना त्या पंधराशे रुपयांची किंमत कळते. या लोकांना आता आमच्या बहिणीच उत्तर देतील, असा निशाणाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला.