सातारा : लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता असली तरी सातारा पालिकेत सोमवारी मोठा भूकंप झाला. ठेक्याची अनामत रक्कम देण्यासाठी तब्बल २ लाख ३० हजारांची लाच घेताना उपमुख्याधिकारी संचित धुमाळ हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. या प्रकरणात आणखीन काही अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.याबाबत माहिती अशी की, पालिकेने गेल्यावर्षी घंटागाडीचा ठेका ह्ययशश्रीह्ण व ह्यसाई गणेशह्ण या खासगी कंपन्यांना दिला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये या दोन्ही कंपन्यांचा करार संपला. करार करण्यापूर्वी ह्ययशश्रीह्णकडून २२ लाख रुपये अनामत रक्कम जमा करून घेण्यात आली होती.
संबंधित ठेकेदारांकडून ही रक्कम परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यापैकी सात लाख रुपये पालिकेकडून देण्यात आले. मात्र, उर्वरित पंधरा लाख रुपयांसाठी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ व आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांकडून तीन लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली.
अखेर २ लाख ३० हजार रुपये देणे मान्य झाले. तत्पूर्वी संबंधित ठेकेदाराकडून लाचलुचपत विभागात संबंधितांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. ठरलेल्या वेळेप्रमाणे सोमवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सुहास शिर्के यांनी सापळा रचून उपमुख्याधिकारी धुमाळ यांना तक्रारदाराकडून २ लाख ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणात आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांची नावे समोर आली असून, त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू झाली आहे.