फलटण : ‘झिरपवाडी (ता. फलटण) येथील ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी संबंधित विभागास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले असून, शनिवारी त्याप्रमाणे अधिकारी वर्गाने पाहणी करून दुरुस्तीबाबत प्रस्ताव दाखल केला आहे,’ अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
सातारा येथे सातारा जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कोरोनाचे पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण, माण तालुक्यांतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडली. यावेळी फलटण तालुक्यातील १९९७ मध्ये झिरपवाडी येथे ग्रामीण रुग्णालयाची आठ एकर जागा आहे. त्यामध्ये रुग्णालय इमारत, डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था केली होती. परंतु राजकीयदृष्ट्या याचे आतापर्यंत उद्घाटन होऊ शकले नाही. बरेच वर्षे ही इमारत पडून असून, फलटण तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने हे रुग्णालय सुरू होणे खूप गरजेचे आहे.
या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी असल्यामुळे ऊसतोडणी कामगारही मोठ्या प्रमाणात फलटणला येत असतात. त्यामुळे सामान्य जनतेसाठी हे हॉस्पिटल सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा नियोजनामध्ये याबाबत प्रस्ताव दाखल केला आहे. तरी याबाबत पुढे काही झाले नाही, असे निदर्शनास आणून देताच उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, सिव्हिल सर्जन, यांना तातडीने हे रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत व शनिवारी संध्याकाळपर्यंत अहवाल देण्याची सूचना केली.
त्याप्रमाणे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयाची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. यावेळी अधीक्षक अभियंता मुनगीवार, उपअभियंता तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अंशुमन धुमाळ, डॉ. शुक्ला यांनी पाहणी करून दुरुस्तीबाबत प्रस्ताव दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयस ७.८५ कोटी निधी उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले.
चौकट...
५० लाखांचा निधी वर्ग करण्याच्या सूचना...
या रुग्णालयाचा फलटण, माण, खटाव अन् माळशिरस या भागातील गोरगरीब जनतेला याचा फायदा होणार आहे. या रुग्णालयास ५० लाखांचा निधी वर्ग करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. या पाहणीमध्ये पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अभिजित नाईक-निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव आदी उपस्थित होते.
२९ झिरपवाडी
झिरपवाडी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.