सातारा: औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी केलेल्या बिलाची टक्केवारी म्हणून १७ हजारांची लाच घेताना कामगार विभागाचा उपसंचालक नंदकिशोर आबासाहेब देशमुख (वय ४५, रा. विंडवड्स सोसायटी, वाकड, पुणे) याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता औद्योगिक वसाहतीत करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार हे प्रमाणक शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी एमआयडीसीमधील दोन कंपन्यांच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी केली होती. त्याची बिले सातारा औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक सुरक्षा व कामगार विभाग कार्यालयात मंजुरीसाठी देण्यात आली होती. ५८ हजार ४०० रुपये बिलाच्या ३० टक्के प्रमाणे १७ हजार ५२० रुपयांची लाच उपसंचालक नंदकिशोर देशमुख याने मागितली. त्यानंतर तक्रारदार शल्यचिकित्सक यांनी लाचलुचपत कार्यालयात जाऊन रीतसर लेखी तक्रार केली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता उपसंचालक लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी सायंकाळी औद्योगिक वसाहतीमध्ये अधिकाऱ्यांनी सापळा लावला. या सापळ्यात उपसंचालक १७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन राऊत, पोलिस नाईक गणेश ताटे, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी या कारवाईत भाग घेतला.