सातारा : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चायनीज खाद्यपदार्थ, राईस अन् धारदार कटर सापडल्याने कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी गुरुवारी अचानक भेट देऊन कारागृहाची पाहणी केली. यावेळी कारागृह अधीक्षक गोविंद राठोड उपस्थित होते.
कारागृहातील सर्कल नंबर दोनमधील कैद्यांच्या अंघोळीसाठी केलेल्या पत्र्याच्या शेडजवळ एक खाकी रंगाची पिशवी बाहेरून कोणीतरी टाकली होती. त्यानंतर कारागृहातील अधिकाऱ्यांनी त्या पिशवीतील साहित्याची पाहणी केली असता त्यात चायनीज राईस व एक धारदार कटर त्या पिशवीत सापडले होते. तसेच त्या पिशवीतील एका चिठ्ठीवर ‘बाबा, तेरा तारखेपर्यंत काम झाले पाहिजे,’ असा मजकूर लिहिला होता. या प्रकारामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा तसेच कारागृहाच्या बा' सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी गुरुवारी कारागृहाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत योग्य त्या सूचना दिल्या.
कारागृह प्रशासनाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हवालदार एस. व्ही. सपकाळ यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. हवालदार सपकाळ यांनी गुरुवारी यासंदर्भात काही लोकांचे जाबजबाब घेतले आहेत. मात्र, कारागृहाच्या भिंतीवरून आतमध्ये साहित्य कोणी व कारागृहात कोणासाठी टाकले, हे अद्याप समोर आले नाही. येत्या काही दिवसांत यातील वस्तुस्थिती समोर येईल, असे हवालदार सपकाळ यांनी सांगितले.