कऱ्हाड : शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी गुरुवारी कारवाईचा बडगा उगारला. यावेळी शेकडो जणांवर कारवाई करण्यात आली. मात्र, एका दुचाकीस्वाराने पोलिसांची चांगलीच झोप उडविली. रस्त्यावर फिरणाऱ्या ‘त्या’ दुचाकीस्वाराला अडवले असता ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आहे’ असे त्याने सांगितले. हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रस्त्यावर विनाकारण कोणीही येऊ नये, असे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या नियोजनाचे नागरिकांनी तीन-तेरा वाजविले आहेत. लॉकडाऊन नावाला उरला असून रस्ते गर्दीने गजबजलेले पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील स्वत: त्यासाठी रस्त्यावर उतरले. यावेळी प्रत्येक वाहन अडवून चौकशी करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच काहीजणांना दंडही करण्यात आला.
अत्यावश्यक कारणास्तव बाहेर पडलेल्या नागरिकांचे प्रमाण यावेळी नगण्य होते. अनेकजण किरकोळ कारणास्तव रस्त्यांवरून फिरत असल्याचे दिसून आले. संबंधितांना पोलिसांनी समज देऊन सोडले. मात्र, पुन्हा विनाकारण रस्त्यावर दिसल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.
- चौकट
विनाकारण फिरणाऱ्यांची कारणे अनेक
काहीजणांनी पोलिसांना रुग्णालयांचे जुने केसपेपर, औषधांच्या जुन्या चिठ्ठ्या दाखवून तसेच बोगस ओळखपत्र दाखवून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खातरजमा करूनच त्यांना सोडले. खोटी कारणे सांगणाऱ्यांनाही पोलिसांनी दणका दिला.
- कोट
कोरोनाबाधित रुग्णांना इतर चाचणीसाठी किंवा कोणत्याही इतर वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडावे लागणार असेल तर त्यांनी रुग्णवाहिकेचा वापर करावा. दुचाकीवरून त्यांनी बाहेर पडू नये. एखादा रुग्ण दुचाकीवरून फिरताना आढळल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याला थेट कोरोना केअर सेंटरमध्ये अॅडमिट केले जाईल.
- डॉ. रणजित पाटील
पोलीस उपअधीक्षक, कऱ्हाड
फोटो : २०केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात गुरुवारी सकाळी पोलिसांनी वाहने अडविण्यास सुरुवात केल्यानंतर भेदा चौक ते विजय दिवस चौकापर्यंत शेकडो वाहनांची रांग लागली होती. (छाया : अरमान मुल्ला)