सातारा : पुण्याहून साताऱ्याकडे कारने येत असताना खेड शिवापूरजवळ झालेल्या अपघातात पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांच्यासह त्यांचा चालक जखमी झाला. हा अपघात गुरूवारी रात्री साडे अकराच्यास सुमारास झाला.याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस मुख्यालयात उपाधीक्षक (गृह) असलेले राजेंद्र साळुंखे हे कामानिमित्त पुण्याला गेले होते. सायंकाळी काम आटोपून ते साताऱ्याला येत असताना खेड शिवापूर टोल नाक्याजवळ त्यांच्या गाडीला खड्ड्यांमुळे अपघात झाला.
या अपघातात साळुंखे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना बारा टाके पडले आहेत. त्यांचे चालक बोराटे हे किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्यातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये साळुंखे यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, सातारा जिल्हा न्यायालयात नोकरीस असलेल्या महिला हवालदार उमा घार्गे या सकाळी साडेदहाच्या सुमारास न्यायालयात निघाल्या होत्या. त्यावेळी एलआयसी इमारतीजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत घार्गे या जखमी झाल्या. त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. साताºयातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.