सातारा : वाढत्या उन्हाळ्याचा परिणाम भाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. परिणामी भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. सध्या कोथिंबिरीच्या लहान पेंडीला ५ रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर देशी गवारचा दर ६० रुपयांच्या पुढे तर वांग्याचा दर ४० रुपयांना किलो झाल्याचे दिसत आहे. उन्हाळा सुरू झाला की, भाज्यांचे दर नेहमीच वाढतात. आता उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी होऊ लागली आहे. १५ दिवसांपूर्वी सरासरी सुमारे २५ क्विंटल वांगी येथील बाजार समितीत विक्रीसाठी येत होती. दि. ११ रोजी फक्त १८ क्विंटलची आवक झाली. दोडका, फ्लॉवर, कारली यांची आणि पालेभाज्यांचीही तीच स्थिती आहे. सध्या लग्नसराई आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी आहे. विशेषत: वांगी, फ्लॉवरला जास्त मागणी असल्याने त्यांचे दर किलोस १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. संकरित शेवगाही बाजारात उपलब्ध आहे. त्याचे दर ४० रुपये आहे. मात्र, गावठी शेवग्यास ६० रुपये मोजावे लागत आहेत. सातार्याच्या ग्रामीण भागात नागठाणे, भाटमरळी, आसगाव, शिवथर, जिहे, खेड येथे भाजीपाल्यांची शेती केली जाते. तसेच बाजार समितीत इतर तालुक्यांतूनही भाजीपाल्यांची आवक होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भाज्यांची आवक घटली होती. गेल्या रविवारी त्यामध्ये सुधारणा झाली. मात्र, आता पुन्हा भाज्यांची आवक घटली आहे. पालेभाज्यांची आवक अधिक घटली आहे. तांदळ, चाकवत पेंडीही १० रुपयास मिळत आहे. मेथीची पेंडी १५ रुपये त्याचप्रकारे शेपुच्या पेंडीचाही दर १५ रुपये झालेला आहे. सध्या टोमॅटो १० रुपये किलो, हिरवी मिरची ३० रुपये, दुधी भोपळा ३०, फ्लॉवर ४० ते ५० रुपये, भेंडी ४० रुपये, सिमला मिरची ८० रुपये, दोडका ४० रुपये असे सरासरी दर आहेत. (प्रतिनिधी)
देशी गवार ६० रुपये किलो..! आवक कमी : भाज्यांचे दर वाढले
By admin | Published: May 13, 2014 11:56 PM