वडूज : ‘खटाव-माण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष संघटनेची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी पूर्वीचे मतभेद बाजूला सारून व जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काँग्रेसची व्रजमूठ आणखी घट्ट करणार आहे,’ असे सुतोवाच प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी केले.
येथील फिनिक्स सभागृहात काँग्रेस पक्षाच्या खटाव-माण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी महेश गुरव आणि माण तालुकाध्यक्षपदी बाबासाहेब माने यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजीव साळुंखे, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे, उपाध्यक्ष शंकर माळी, विजय शिंदे, मोहन देशमुख, परेश जाधव, सत्यवान कांबळे, पोपट मोरे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘यापूर्वी पदाधिकारी निवडीत काही राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होऊन या पदाधिकाऱ्यांना निवडणुकी दरम्यान गृहित धरले जात होते. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा रिमोटच आपल्या हातात असल्याच्या अविर्भावात ते वावरत होते. मात्र, यापुढे असे काहीही होणार नाही. पक्षनिष्ठेला महत्त्व देणारे नूतन पदाधिकारी सक्षम आहेत.’ यावेळी विजय शिंदे, संजीव साळुंखे, महेश गुरव, बाबासाहेब माने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. नीलेश जाधव, डॉ. संतोष गोडसे, डॉ. बाळासाहेब झेंडे, किशोर झेंडे, राहुल संजगणे, धर्मराज जगदाळे, दाऊद मुल्ला, शिवाजीराव यादव आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचे प्रवक्ता ॲड. संतोष भोसले यांनी प्रास्तविक केले. खटाव-माण विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष सचिन घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ०९ शेखर जाधव
वडूज येथे काँग्रेस पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात रणजितसिंह देशमुख यांनी मार्गदर्शन केले. (शेखर जाधव)