जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : घरातील कर्त्या माणसाच्या निधनानंतर मुलांना कसं वाढवायचं हा प्रश्न होता. एक-दोन जणांना जेवणाचे डबे सुरू केले. हे करत असतानाच सामाजिक कार्यही सुरू होते. अन् त्यातूनच भोजनालयाचा मार्ग सापडला. सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट कलाकरांना डबे बनवून देऊ लागल्या अन् त्यातूनच त्यांच्या घराला आधार मिळाला.
ही कहाणी आहे पसरणी येथील समिंद्रा साहेबराव येवले यांची. पतीचे निधन झाल्यानंतर दोन मुलं, मुलगी यांना घेऊन त्या माहेरी आसगावला आल्या. तेव्हा आसगावने ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. या चळवळीत त्यांनीही योगदान दिले. गावात पाहणीसाठी राज्यभरातून मोठ-मोठी माणसं येत होती.त्यांना गावाची माहिती देणं, त्यांच्या जेवणाची सोय समिंद्रा येवले याच करू लागल्या. गावातील महिलांना व्यासपीठ मिळावे म्हणून येवले यांनी पुढाकार घेऊन दुर्गोत्सव सुरू केला. त्यातून अनेक कार्यक्रम आयोजित करुन महिलांना व्यासपीठ उपलब्ध केले.
दरम्यानच्या काळात ‘बाबा लगीन’चं चित्रीकरण आसगावमध्ये चार महिने चालले. त्यातील तीनशेहून अधिक कलाकारांना जेवण बनविण्याचे काम त्यांना मिळाले. अशोक सराफ, मंगेश देसाई, सुरेखा कुडची, किशोरी आंबी, किशोर गोडबोले ही दिग्गज मंडळी त्यांच्याकडे जेवायला येत. येवले यांच्या हाताला चव असल्याचे कलाकारांनी अनेकदा कौतुक केले. त्यानंतरही त्यांनी एका चित्रपटातील कलाकारांसाठी जेवण बनवून दिले.
समिंद्रा येवले यांनी पुढे गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी साताºयात येऊन जिल्हा परिषदेच्या पाठीमागे एक भोजनालय सुरू केले. त्यामध्ये त्या व मुलगा सागर काबाड कष्ट करतात. हाच व्यवसाय वाढविण्याचा त्यांचा मानस असून घरोघरी डबे, पोळी-भाजी पोहोच करणे, छोट्या भोजनालयाचे मोठ्या व्यवसायात रुपांतर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.त्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे पाचला होते. नास्ट्याची तयारी केली जाते. सकाळी सातपासून साडेनऊपर्यंत नास्टा त्यानंतर लगेच जेवणाची तयारी सुरू होते. तेथे दिवसाला शंभरहून अधिक लोक जेवणासाठी येतात. त्यामुळे भाज्या करणे, चपात्या बनविणे सर्वप्रकारची कामे ते स्वत: करतात. ग्राहकांच्या आवडीनुसार जेवण बनविण्यावर त्यांचा भर असतो.
समाजाशी झगडत, संकटाचा मुकाबला करत समिंद्रा येवले यांनी भोजनालयाच्या माध्यमातून संसार उभारला. त्यांचा एक मुलगा परदेशी असून, त्यांनी मुलीचंही लग्न लावून दिलं. पती निधनानंतर खचून न जाता जिद्दीनं उभं राहिलेल्या समिंद्रा येवले यांची कहाणी आजच्या महिलांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे.आसगावमध्ये असताना घर सांभाळत असतानाच सामाजिक कार्यही करत होते. वैभवलक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अनेक उपक्रम राबवत असत. महिलांसाठी दुर्गोत्सव सुरू केला. या कामाचं आजही गावामध्ये आठवण काढली जाते.- समिंद्रा येवले, सातारा