लोणंद : लोणंदमधून जाणाऱ्या सातारा-पुणे रस्त्यावरील गोठेमाळ ते अहिल्यादेवी स्मारक चौक दरम्यानची अतिक्रमणे मंगळवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात आली. सायंकाळपर्यंत ५५ ठिकाणच्या अतिक्रमणावर कारवाई झाली होती. यामध्ये टपऱ्या, शेड, दुकानांचे फलक काढण्यात आले. बुधवारीही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे लोणंदकरांची अतिक्रमणातून मुक्तता झाली आहे.दि. २७ एप्रिल रोजी ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. रस्त्यावरील अतिक्रमणाने वाहतुकीची कोंडी, प्रशासनाने रस्ता मोकळा करावा, असे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. येथील गोठेमाळ ते अहिल्यादेवी स्मारक चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे होती. त्यामुळे यासंबंधी १८३ जणांना अतिक्रमणे काढण्यासदंर्भात नोटीस बजावल्या होत्या. परंतु नागरिकांनी अतिक्रमणे न काढल्यामुळे सार्वजनिक बांधकाम, तहसीलदार, लोणंद नगरपंचायत, लोणंद पोलिस स्टेशन यांच्या सहकार्याने मंगळवारी अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. लोणंदमधील काही लघु व्यावसायिक, टपरीधारक यांनी आपले व्यवसाय बंद करत स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेत सहकार्य केले तर काही धनदांडगे लोकांचे अतिक्रमण पाडण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लघु व्यावसायिक, खोकी धारक, टपरी, हातगाडे हे छोटे-मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असून, त्यांचे नगरपंचायतीने पुनर्वसन करून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून मागणी होत आहे. (वार्ताहर)
लोणंदमधील अतिक्रमणे उद्ध्वस्त
By admin | Published: May 02, 2017 11:55 PM