वाई : वाहनांच्या डिझेल, पेट्रोल टाकीतील बसवण्यात येणाऱ्या व्हॉल्व्हची वाहतूक करणारा टेम्पो वाई येथे उभा असताना त्यातून दोन व्हॉल्व्हची चोरी करण्यात आली. याप्रकरणी वाई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत साळुंखे यांनी टेम्पो (एमएच ११ सीएच ४३९०) मध्ये कोईमतूर येथील एटीओ (आय १) या कंपनीतून भारत पेट्रोलियम माहूल, मुंबई या कंपनीचे व्हॉल्व्ह असलेले बॉक्स घेऊन मुंबईला निघाले होते. कंपनीला २७ नोव्हेंबरपासून सलग तीन दिवस सुट्या असल्याने त्यांनी टेम्पो गंगापुरी, वाई येथे त्यांच्या घराजवळ असलेल्या यात्रा मैदानात उभा केला होता.
सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते माल घेऊन जाण्यासाठी गाडीजवळ गेले असता त्यांना गाडीची ताडपत्री व रस्सी उचकटलेली दिसली. त्यांनी खात्री केली असता एक लाख किमतीचे डिझेल, पेट्रोल ट्रॅक्टरला लावण्याकरिता वापरण्यात येणारे दोन व्हॉल्व्ह चोरीस गेल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी वाई पोलीस ठाण्याला तक्रार दिलेली आहे.
वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी तपास करीत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले एक लाख किमतीचे दोन व्हॉल्व्ह जप्त केले आहेत.