पेट्री : शहराच्या पश्चिमेस कास परिसरात पावसाने दडी मारल्याने भात व नाचणीच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून कास परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीची कामे रखडली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भातलावणी करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरवर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात भात, नाचणीच्या लावणीला सुरुवात करण्याचा शेतकऱ्यांचा कल असतो. परंतु पाऊस योग्य वेळी न पडल्याने नाईलाजाने शेतीची कामे थांबवावी लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कास परिसर तसेच डोंगरमाथ्यावरील भागात भात, नाचणी, वरीची रोपे उन्हाच्या तडाख्यामुळे करपू लागली आहेत. पावसाअभावी वावरात चिखल होत नसल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. काही ठिकाणी भात, नाचणीची रोपे उन्हामुळे पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
कास परिसरात अधूनमधून अत्यल्प तुरळक पाऊस पडत असला तरी उन्हाच्या तडाख्यामुळे भातशेती किंवा नाचणीसाठी हा पाऊस फायदेशीर नसून बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला; परंतु लावणीसाठी हवा असणारा पाऊस अद्याप नाही. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खतांचा खर्च, मशागतीचा खर्च करून तरव्यांची पेरणी केली. भात, नाचणीच्या रोपांची वाढ चांगली झाली आहे. मात्र, पाऊस नसल्याने रोपे वाळायला लागली आहेत. त्यामुळे कास परिसरात शेतकऱ्यांना खरीप हंगाम वाया जाण्याची भीती वाटत आहे.
(चौकट)
वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला.....
कास परिसर व डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. संपूर्ण शेती पावसावर अवलंबून असून, येथील शेतकरी प्रामुख्याने शेती करून भात, नाचणीची पिके घेतात. बऱ्याचदा हातातोंडाशी आलेल्या पिकांना वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागते. सध्या पावसाने उघडीप दिल्याने लावणीचे संकट समोर उभे राहिले असल्याने शेतकरीवर्ग चिंतातुर आहे.
(कोट)
भात नाचणीच्या तरव्याच्या पेरण्या होऊन महिना सव्वा महिना झाला. परंतु अद्याप पाऊस नसल्याने लावणीची कामे रखडली असून, पिकेदेखील वाळायला सुरुवात झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-आत्माराम आखाडे, शेतकरी, कुसुंबीमुरा
०७पेट्री
कास परिसरात ओढ्यालगत असणाऱ्या रोपांना पाणी देता येते. परंतु पूर्णतः पावसावर अवलंबून असणारी रोपे वाळायला सुरुवात झाली आहे. (छाया : सागर चव्हाण)