वाठार स्टेशन : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सण, उत्सवात ध्वनीप्रदूषण करणाºया मोठ्या आवाजाची वाद्ये वाजविणार नसून याऐवजी पारंपरिक वाद्य वाजविणार असल्याचा निर्धार देऊरकरांनी केला. स्वातंत्र्यदिनानिमत्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत हा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.
कोरेगाव तालुक्यातील देऊर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच निलीमा कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मयुर वैरागकर, उपसरपंच बाळासाहेब कदम, सदस्य प्रदीप कदम, राजेंद्र कदम, अजित कदम, वसंत जाधव ग्रामसेवक राहुल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मयुर वैरागकर म्हणाले, ‘वाठार स्टेशन कार्यक्षेत्रात असलेल्या प्रत्येक गावाने देऊर सारखा डॉल्बी बंदीचा निर्धार करावा. केवळ गणेशोस्तवच नव्हे तर लग्नकार्यालयात सुध्दा डॉल्बी वाजवण्यात येऊ नये. यासाठी या भागातील सर्व मंगल कार्यालयाच्या मालकांना वाठार पोलिसांकडून डॉल्बी न वाजविण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे.
सरपंच निलिमा कदम म्हणाल्या, ‘देऊर गावाला धार्मिक ऐतिहासिक आणि शिक्षणाचा वारसा आहे. हा जोपासण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. गावातील शाळा तसेच धार्मिक मंदिरांचा जिर्णोध्दार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हंबीरराव कदम, विठ्ठल कदम, वसंतराव कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.