सातारा : व्यसनमुक्त झालात तर तुमच्या ध्येयाकडे जाण्यास गती मिळेल. स्वतःवर व जगण्यावर प्रेम करा. व्यसनाने माणूस अनेक आनंदी क्षणांना मुकतो, व्यसन सोडणे स्वतःच्या निर्धाराने शक्य आहे, यासाठी व्यसन सोडा, असे आवाहन सिने व नाट्यअभिनेते किरण माने यांनी केले.
परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने ३१ मे या ‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. स्वत: व्यसनाच्या विळख्यातून कसे बाहेर पडलो, याविषयी त्यांनी अनुभव सांगितले. कला व्यक्त करण्यासाठी व्यसनाची गरज असते, ही अंधश्रद्धा आहे, असे देखील ते म्हणाले. या वेळी डॉक्टर हमीद दाभोलकर, कुमार मंडपे, प्रमोदिनी मंडपे, अनिल तेंडोलकर यांची उपस्थिती होती.
किरण माने पुढे म्हणाले की मैत्रीचा पूल म्हणून किंवा गैरसमजातून व्यसन सुरू होते. त्याचे रूपांतर सवयीत व मग व्यसन आणि पुढे आजारापर्यंत टप्प्याटप्प्याने जाते. म्हणून वेळीच विचार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, कोरोनाने जगात दोन लाख मृत्यू झाले, पण तंबाखूमुळे दरवर्षी दहा लाख मृत्यू होतात. त्यामुळे तंबाखूच्या व्यसनाकडे अक्षम्य दुर्लक्ष करू नका. तंबाखूचे व्यसन सोडताना पहिल्याच प्रयत्नात यश येईल असे नाही, पण प्रयत्न करत राहा, त्यामुळे व्यसन सुटू शकेल, असा विश्वास त्यांनी दिला.
परिवर्तन संस्थेमधील मानसरंग गटातील मानसिक आजारातून बाहेर पडत असणाऱ्या रुग्णांनी वेगवेगळ्या कला सादर केल्या. गुरुदत्त शेजवळ व राजेंद्र पवार यांनी आपले व्यसनमुक्तीचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली भोसले यांनी केले. स्वागत व ओळख योगिनी मगर यांनी, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय चव्हाण यांनी केले. राणी बाबर यांनी आभार मानले.