मल्हारपेठ : ‘गतवेळच्या आमदारांनी विकासाच्या फक्त वल्गना केल्या. त्यांच्याकडून कोणतीही ठोस विकासकामे विभागात झालेली नाहीत. सध्या जिल्ह्यात एक नंबरचे विकासकाम पाटण तालुक्यात करावयाचे असून, पाच वर्षांत जनतेच्या डोळ्याला दिसतील अशी विकासकामे करणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले. उरूल, ता. पाटण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलतचे अध्यक्ष मिलिंद पाटील, पंचायत समितीचे उपसभापती डी. आर. पाटील, देसाई कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वेल्हाळ, पंचायत समिती सदस्या विजयाताई देसाई, कारखान्याचे संचालक पांडुरंग नलवडे, शशिकांत निकम, अॅड. संग्राम निकम, उरूल सरपंच राजश्री निकम, उपसरपंच नितीन निकम, बोडकेवाडी सरपंच डॉ. अण्णासाहेब देसाई, शिवाजी देसाई, दादासाहेब देसाई आदी उपस्थित होते. यावेळी मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील उरूल ते चाफळ फाटा, निसरे फाटा ते विहे, निसरे विहीर ते गारवडे फाटा व माजगाव ते गमेवाडी अशा विविध रस्त्यांच्या कारपेट, सीलकोट दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार देसाई म्हणाले, ‘२०१६-१७ च्या अर्थसंकल्पातून मंजूर झालेली ८० कोटींची कामे पहिल्या टप्प्यात सुरू करावयाची आहेत. आपण ५० लाख रुपयाच्या वर असणाऱ्या ५५ कामांची भूमिपूजने सुरू करणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील २५ ते ३० कामे मंजूर आहेत. मात्र, त्यांना पैसे मिळालेले नाहीत. ती कामे दसरा ते दिवाळीपर्यंत मंजूर होतील. युती शासनाने सर्वात जास्त निधी पाटण तालुक्याला दिला आहे. उरूल भागातील बंधारा काम व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी पाठपुरावा चालू ठेवला आहे. तसेच गणेवाडीकडे जाणारा रस्ता वन विभागाच्या अडथळ्यामुळे थांबला होता. तो मंजूर करून आणला आहे.’ बजरंग माने यांनी प्रास्ताविक केले. आबासाहेब माने यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
माजी आमदारांकडून विकासाच्या वल्गना : देसाई
By admin | Published: October 02, 2016 12:41 AM