लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : करंजे भागाच्या विकासाला सातारा विकास आघाडीने नेहमीच प्राधान्य दिले आहे. याहीवेळी करंजे भागाचा विकास करण्यासाठी सातारा विकास आघाडी कुठेही कमी पडलेली नाही. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून एकूण सव्वातीन कोटींच्या कामाचे भूमिपूजन होत असताना, करंजेकरांसाठी ठोस काही करू शकलो याचे समाधान वाटते,’ असे उद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले.
महेर देशमुख कॉलनी येथील हरित पट्टा विकसित करणे व त्यास संरक्षक भिंत बांधणे, पूर्वीच्या सेनॉर हॉटेल चौक ते करंजे नाका या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि करंजे येथील प्रभाग क्रमांक १० मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण-काँक्रिटीकरण करणे या तीन कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक ॲड. डी. जी. बनकर, बाळासाहेब ढेकणे, ज्ञानेश्वर फरांदे, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे आदी उपस्थित होते.
मनोज शेंडे म्हणाले, ‘हद्दवाढीमुळे करंजे भागाचा विस्तार झाला आहे. येथील नागरी वसाहतीदेखील वाढत आहेत. मेहेर देशमुख कॉलनी येथील हरित पट्ट्याचा विकास करण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन या ठिकाणी संरक्षक भिंत, अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. ही सर्व कामे मंजूर करताना खासदार उदयनराजे भोसले यांनी करंजेच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न करा, अशा सूचना केल्या. करंजे गावच्या वतीने ज्येष्ठ काका किर्दत यांनी खा. उदयनराजे भोसले यांचे स्वागत केले. यावेळी आजी-माजी नगरसेवक, करंजे येथील नागरिक उपस्थित होते.