सातारा : सातारा शहरालगत असलेल्या उपनगरांचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र, त्याप्रमाणात उपनगरांचा विकास होत नसल्याने तेथे राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या मानाने उपनगरांच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. उपनगरांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपनगरांचा समावेश पालिका हद्दीत होणे आवश्यक आहे. उपनगरांच्या विकासासाठी हद्दवाढ हाच एकमेव पर्याय आहे, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरालगत शाहुपूरी, शाहूनगर आदी उपनगरे वसली आहेत. या उपनगरांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मात्र या उपनगरांमध्ये रस्ते, पाणी, पथदिवे, कचरा आदी समस्या सातत्याने भेडसावत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न केला. मात्र उपनगरांच्या विकासासाठी शासनाकडून भरीव निधी मिळत नाही. या उपनगरांना बाजारहाट, आरोग्य, दळणवळ आदी दैनंदीन बाबींसाठी सातारा शहरावरच अवलंबून रहावे लागते. उपनगरात कचऱ्याची मोठी समस्या असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीही पालिकेवर अवलंबून रहावे लागते. निधी अभावी उपनगरातील रस्त्यांची मोठ्याप्रमाणात दुर्दशा झाली आहे. गटारे, पथदिव्यांची वाणवा आहे. आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत रस्त्यांचा मुद्दा पुढे करुन काही लोकांनी हद्दवाढीला विरोध केला होता. मात्र आता सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. पावसाळ्यांनतर शहरातील उर्वरीत सर्व रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. झोपडपट्टी मुक्त शहरासाठी पालिकेने घरकुल योजना राबवली आहे. त्याचप्रकारे उपनगरांचा विकास झाला पाहिजे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)उपनगरांना दर्जेदार सोयी, सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढ होणे आवश्यक आहे. याची जाणीव उपनगरातील नागरिकांना असून हद्दवाढीला नागरिकांचा विरोध नाही. मात्र, आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या खोट्या आशेपायी काही लोक उपनगरांना विकासापासून वंचीत ठेवत आहेत.हद्दवाढीसाठी आपण मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही हद्दवाढीबाबत चर्चा केली आहे.- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार
पालिका हद्दीत समावेश झाल्यास उपनगरांचा विकास
By admin | Published: July 10, 2015 10:07 PM