मायणी : ‘विकासकामे करण्याची प्रबळ इच्छा असली तर विकास कामे होत राहतात. त्यामुळे विकासाची गती कायम राखण्यात यश येत असते. माजी आमदार दिवंगत भाऊसाहेब गुदगे यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची विकासकामे करून भाऊसाहेब गुदगे यांचा वारसा आपण सुरू ठेवू,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
कलेढोण (ता. खटाव) येथे कलेढोण-आतकरी मळा-भिकवडी या रस्त्याच्या ४० लाख रुपये खर्चाच्या डांबरीकरण कामाचा प्रारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासाहेब कचरे, ग्रामपंचायत सदस्य उस्मान तांबोळी, शंकर पवार व आतकरी मळा, पवार मळा व कलेढोण येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
गुदगे म्हणाले, ‘एखाद्या आमदार-खासदाराच्या विकास कामापेक्षा अधिक विकास कामे करून एक जिल्हा परिषद सदस्य एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आणू शकतो, हे मी माझ्या विकासकामाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.’
मायणी जिल्हा परिषद गटातील कोणत्याही छोट्या-मोठ्या गावात जाऊन पाहिल्यास बंधारा, प्रा. आरोग्य केंद्रे, पशुसंवर्धन केंद्रे, पाणी योजना, स्मशानभूमी शेड शाळा दुरुस्त्या आदी विविध विकासकामांसाठी किमान एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची विकासकामे झालेली पाहावयास मिळतील.