सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या असल्या तरीदेखील सातारा शहरात गेल्या काही दिवसांत विकासकामांचा धडाका सुरू झालाय. विशेष म्हणजे साताऱ्याचे दोन्ही राजे शहर व हद्दवाढ भागात सक्रिय झाले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत रस्ते, नाले, पथदिवे अशा पायाभूत कामांचे नारळ दररोज फुटू लागले आहेत.सातारा पालिकेचा कारभार प्रशासकीय राजवटीत सुरू असला तरी पालिकेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील शहरासह हद्दवाढ भागावर आपले लक्ष केंद्रित करुन विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. शहरात रस्त्यांचे डांबरीकरण, नाले, पथदिवे, अजंठा चौक येथील फ्लायओव्हर अशा पायाभूत कामांचे नारळ फुटू लागले आहेत.हद्दवाढ भागासाठी शासनाने तब्बल ४८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतूनही मूलभूत कामे सुरू झाली आहेत. शहरात एकीकडे विकासकामांचे नारळ फुटत असताना दुसरीकडे दोन्ही राजेंमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. केलेल्या कामांचे भले मोठे फ्लेक्स शहरात झळकत आहेत. हे वातावरण पाहता पालिकेची निवडणूक जवळ आली की काय? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.कामे होतायत ते महत्त्वाचे...राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे होतच राहणार. त्यामुळे अशा गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा शहरात उशिरा हा होईना परंतु चांगली कामे होत आहेत, हे आमच्यााठी महत्त्वाचे आहे. ही कामे करत असताना ती दर्जेदार व्हावीत, शहरात पाणीटंचाई भासणार नाही याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी काळजी घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य सातारकर व्यक्त करीत आहेत.ही तर गोळाबेरीज...
- निवडणूक केव्हा लागेल तेव्हा लागेल परंतु विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहणे हे दोन्ही राजेंचे शिलेदार चांगलेच जाणून आहे. त्यामुळेच राजेंबरोबर भावी नगरसेवक देखील आपापल्या वॉर्डात अधिक सक्रिय झाले असून, नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवत आहेत.
- जिथे पाणी नसेल तिथे स्वखर्चातून टॅँकर दिले जात आहेत. वेगवेगळे कार्यक्रम, शिबिरे आयोजित केले जातील. अनेकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले असून, या माध्यमातूनही नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.