कऱ्हाड : आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल जाहीर भाषणात अपशब्द वापरणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना तालुक्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिला. तसेच या वक्तव्याचा निषेध म्हणून शुक्रवारी रात्री दत्त चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली.कऱ्हाड दक्षिणेत महायुतीच्या प्रचाराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. येथे त्यांची जाहीरसभा झाली. त्यावेळी त्यांनी आमदार चव्हाण यांच्याविरोधात टीका केली. त्यात त्यांनी अपशब्द वापरले, असा आरोप करत काँग्रेसने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दत्तचौकात जाहीर निषेध केला. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी, महिलांनी फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या हातामध्ये निषेधाचे फलक लावले होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी शिवराज मोरे म्हणाले, आमदार पृथ्वीराज चव्हाण स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत. त्याची राज्य, देशाला ओळख आहे. मात्र तरीही जाणून बुजून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले गेले. ते द्वेषा पोटीच. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आम्ही निषेध करतो. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या काही तासांत माफी न मागितल्यास उद्या कऱ्हाड शहरामध्ये विराट मोर्चा काढून त्यांचा निषेध नोंदविण्यात येईल त्याचबरोबर त्यांना कऱ्हाड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही.मनोहर शिंदे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या चरित्राबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल देशाला माहिती आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा कृतीचा वारसा पृथ्वीराज चव्हाण चालवत आहेत, असे असताना भाजप केवळ द्वेषाचे राजकारण करत आहे. आज झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेले आरोप हा जिल्ह्याचा अपमान आहे. त्याविरोधात शनिवारी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी सर्व कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्मारकाजवळ जमावे.
देवेंद्र फडणवीसांनी पृथ्वीराज चव्हाणांबद्दल जाहीर भाषणात वापरला अपशब्द, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:18 PM