सातारा : ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ अशा भावना व्यक्त करत बुधवारी सातारा शहरातील सार्वजनिक मंडळांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. सातारा पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जन करून शहरातील मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सवाची परंपरा यंदाही जपली.गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या शाहूवासीयांकडून यंदा विघ्नहर्ता गणेशाची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस चाललेले पूजा-पाठ, धार्मिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक देखावे, भव्य-दिव्य मंडप, आकर्षक सजावटींनी सर्वत्र चैतन्य पसरले होते. लाडक्या बाप्पांची मनोभावे आराधना करून बुधवारी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींना भक्तांनी निरोप दिला.बुधवार व गुरुवार असा दोन दिवस विसर्जनाचा मुहूर्त असल्याने साताऱ्यातील बहुतांश मंडळांनी बुधवारी सकाळपासून बाप्पांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. सातारा पालिकेकडून विसर्जनासाठी जलतरण तलावासह हुतात्मा स्मारक, कल्याणी शाळा, दगडी शाळा व बुधवार नाका येथे कृत्रिम तळ्याची उभारणी करण्यात आली आहे. या तळ्यात मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी येत होत्या.बुधवार नाक्यावरील सर्वात मोठ्या कृत्रिम तळ्यात क्रेनच्या सहाय्याने मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिरवणूक सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी विसर्जन मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मिरवणुकीतील प्रत्येक बारीक सारी गोष्टींवर सीसीटीव्ही कॅमेरातून नजर ठेवली जात आहे.
साताऱ्यात बाप्पांना भक्तिपूर्ण निरोप, मंडळांनी जपली पर्यावरणपूरक उत्सवाची परंपरा
By सचिन काकडे | Published: September 27, 2023 3:24 PM