पळशी : माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असून शंभू महादेवाच्या यात्रेस दि. २४ मार्च पासून प्रारंभ झाला आहे. बुधवारी एकादशी निमित्त लाखो भाविकांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी मंदिराबाहेर दिवसभर भाविकांची मोठी रांग लागली होती. शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाची चैत्री यात्रा दि. २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत भरते. एक एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या पार्श्वभूमीवर भाविक शिंगणापूर येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. तसेच लहान-मोठ्या कावडीही शिंगणापूर येथे मुक्कामी येत आहेत. यात्रा कालावधीत उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवूू नये यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने नळपाणी योजनेची दुरुस्ती केली आहे. भाविकांसाठी दररोज आठ लाख लिटर पाणी उपलब्ध केले जात आहे. यासाठी शासनाकडून यात्रेसाठी पाण्याचे सहा टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. पाणी शुद्धिकरणासाठी ग्रामपंचायतीने १७ कर्मचारी आरोग्य विभागास दिले आहे. तर दैनंदिन कामकाजासाठी १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच सार्वजनिक शौचालय व जागेची स्वच्छता करण्यासाठी २० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सरपंच राजाराम बोराटे यांनी दिली. आरोग्य विभागामार्फत मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी भाविकांसाठी उपचार व रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. (वार्ताहर)मुंगी घाटातून येणार कावडदि. १ एप्रिल रोजी सासवड येथून येणारी तेली मूर्ती महाराजांची कावड अवघड अशा मुंगी घाटातून येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातू भाविक दाखल होतात. याच दिवशी शंभू महादेवास मानाच्या कावडी धार घालतात. त्यामुळे हा दिवस यात्रेचा मुख्य दिवस मानन्यात येतो. यात्रा कालावधीत शासनाकडून दरवर्षी पिण्याचे दहा टॅँकर उपलब्ध केले जातात.मात्र यंदा केवळ सहा टॅँकर उपलब्ध झाले आहे. परिणामी ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेवर भाविकांना पाणीपुरवठा करावा लागत असून ग्रामपंचायतीवर याचा मोठा ताण पडत आहे.- छाया कर्चे, सरपंच, शिंगणापूर
भोलेनाथाच्या डोंगरावर भक्तीचा पूर!
By admin | Published: March 31, 2015 10:44 PM