सातारा : पालिकेने ४१ घंटागाड्यांचे ठेके करार संपल्याने रद्द केले असून, स्वच्छतेचा ठेका खासगी साशा या कंपनीला दिला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात संतप्त झालेल्या घंटागाडी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
पालिकेतर्फे शहरातील स्वच्छतेचा ठेका ठाणे येथील साशा हाऊस की पिंग अॅँड मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आला आहे. एका खासगी कंपनीला ठेका देऊन पालिकेने घंटागाडी चालक व मालकांवर अन्याय केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यातच पालिकेच्या वतीने ४१ घंटागाड्यांचे ठेके करार संपल्याने रद्द केल्याने संतप्त घंटागाडी संघटनेने शनिवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे.
घंटागाडी चालकांना विना करार सेवा बजावावी, अशी सूचना पालिकेने केल्याने वाद निर्माण झाला आहे. कचरा उचलण्यासाठी पालिकेने दोन दिवसांपासून खासगी गाड्यांची नेमणूक केल्याने या वादाची ठिणगी आणखीनच भडकली आहे. त्यामुळे पालिकेच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी घंटागाडी चालक, मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पालिकेच्या प्रवेशद्वारापासून सकाळी साडेअकरा वाजता हा मोर्चा सुरू झाला. यावेळी घंटानाद करून पालिकेच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. राजपथ, गोलबाग, मोतीचौक, कर्मवीर मार्ग व पोवईनाक्याहून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.