सातारा : माढा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीतील भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदारसंघात संपर्क वाढवितानाच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत रघुनाथराजे नाईक-निंबाळकरही होते. यामुळे धैर्यशील यांची राजकीय जुळवाजुळव सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.माढा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीतील फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदारांविरोधात उठाव केला आहे. तर अकलुजचे मोहिते-पाटील यांचाही रणजितसिंह यांना विरोध आहे. त्यामुळे या दोन्ही घराण्यात आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. त्यातून माढ्याची उमेदवारी करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. पण, उमेदवार कोण असावा हे अजून निश्चित नसलेतरी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पूर्ण तयारी केलेली आहे.
धैर्यशील मोहिते हे भाजपमध्ये आहेत. त्यांच्याकडे पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटकपद आहे. पण, निवडणुकीसाठी ते स्वत: माढ्यातून इच्छुक असताना डावलण्यात आले. यामुळे त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. यासाठी त्यांनी मागील १५ दिवस मतदारसंघात संपर्क वाढवलाय. गावोगावी भेट देऊन चाचपणी केली. तसेच राजकीय नेत्यांच्याही भेटी घेत आहेत. आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर रामराजेंचे बंधू रघुनाथराजे नाईक-निंबाळकर हेही बरोबर होते.या बैठकीचा तपशील नेमका बाहेर आला नसलातरी माढा निवडणुकीच्या अनुषंगानेच ही भेट होती असे समोर आलेले आहे. कारण, महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आहे. तर धैर्यशील यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते. त्यामुळेच शेखर गोरे यांना निवडणुकीत उतरल्यास पाठिशी रहा, अशी साद घालण्यासाठीच धैर्यशील गेले असावेत, असा अंदाज बांधला जात आहे. धैर्यशील मोहिते यांच्या या भेटीने त्यांचे राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे, अशीच चर्चा राजकीय वर्तूळातही सुरू झालेली आहे.