सातारा : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीमाना घ्यावा, अशी मागणी भाजप सातारा शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेणू शर्मा नावाच्या महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अत्याचाराचा आरोप केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पीडित महिलेने मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. एखादी महिला तक्रार दाखल करण्यासाठी आल्यास पोलिसांनी त्वरित तक्रार दाखल करून घ्यावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र, ही तक्रार खोटी असल्याचे सांगत पोलीस ती नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांना पाच अपत्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. निवडणूक आयोगापासून वस्तुस्थिती लपवून त्यांनी आयोगाची पर्यायाने जनतेची फसवणूक केली आहे.
त्यामुळे अशा मंत्र्यांना पाठीशी न घालता मुख्यमंत्र्यांनी मंत्री मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. दरम्यान, मंत्री मुंडे यांच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केले. यावेळी भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सुवर्णा पाटील, बांधकाम सभापती सिद्धी पवार, महिला मोर्चा शहर अध्यक्ष रिना भणगे, वैशाली पंडित, शहर अध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, आदी उपस्थित होते.
फोटो : १८ भाजप आंदोलन
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. (छाया : जावेद खान)