नसीर शिकलगारफलटण : आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या आत्महत्येचा पोलिस तपास करत नसल्याने एका व्यक्तीने स्वतःचे बोट छाटले. धनंजय ननावरे असे बोट छाटून घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमी ननावरे यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेतदिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत सहा जणांना आरोपी केले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.भावाच्या आत्महत्येचा तपास पोलीस नीट करत नसल्याने दिवंगत नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनजय ननावरे यांनी एका व्हिडिओ द्वारे न्याय मिळेपर्यंत शरीराचे एक एक पार्ट छाटण्याचा इशारा दिला होता. भावाच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना पोलीस संरक्षण देत आहेत. त्यांची नावं एफआयआरमध्ये आरोपी म्हणून जोडली गेली नाही तर आठवड्याला आपल्या शरीराचा एक एक भाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असा इशाराही ननावरे यांनी दिला. अन् आज, एक व्हिडिओ करीत त्यांनी आपल्या डाव्या हाताचे एक बोट कापले. याप्रकारानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता धनंजय ननावरे यांना ताब्यात घेऊन पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. अद्याप याबाबत कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
...म्हणून त्याने स्वतःचं बोट छाटलं, व्हिडीओ रेकॉर्ड केला; साताऱ्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 6:08 PM