स्वप्नील शिंदे ।सातारा : गेली चार वर्षे महाराष्ट्र शासनाची जलयुक्त व पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांनी दुष्काळग्रस्तांनी एकजुटीने पेटून दुष्काळाला हरवत गावं पाणीदार केली. यंदा स्पर्धेचं दुसरे पर्व सुरू झाला असून, समृद्ध गावं योजनेचा प्रारंभ झाला आहे. त्यानुसार गावागावांत लोकांचे मनसंधारण करण्यासाठी निसर्गाची धमाळ शाळा भरविण्यात आली आहे.
चार वर्षांपूर्वी अभिनेता आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्या संकल्पनेतून सत्यमेव जयते ‘वॉटर कप स्पर्धा’ सुरू करण्यात आली. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेच्या वेळू, अनपटवाडी, टाकेवाडी, भांडवली, चिलेवाडी आदी गावांनी लोकसहभागातून श्रमदान करून जलसंधारणाची कामे केली. मागील चार वर्षांत केलेल्या कामांचे यंदाच्या पावसात फळ मिळाले.
चार वर्षांपूर्वी उन्हाळ्यात ज्या गावांना टँकरचे पाणी घ्यावे लागत होती. तीच गावे मागील वर्षी परिसरातील इतर गावांना टँकरने पाणीसाठा देऊ लागले. एरवी जानेवारीपासूनच टँकरच्या प्रतीक्षेत असलेल्या गावात आजही ओढे नाले वाहत आहेत. एरवी पिण्यासाठी टँकरवर अवलंबून असणाºया गावात आज आले, कांदे व इतर पिकांतून समृद्धी आली आहे.
अजूनही काही गावे टंचाईग्रस्त असून, त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा गावांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी यंदा ‘माझा समृद्ध गाव’ योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार जनजागृती करण्यासाठी निसर्गाची धमाल शाळा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात साधारण सहा ते आठ पाणीदार गावांमधील शाळांची निवड करण्यात आली आहे. इयत्ता सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. यात ३५ विद्यार्थी अन् विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या शाळेत सहा दिवस मुलांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जात जल, जंगल आणि जीवन संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजे, याबाबत खेळाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना फिल्म दाखवण्यात आली. तसेच शपथ घेत झाड लावणं व जगविण्याचा निश्चय केला. गावामध्ये रॅली व ग्रामसभेचे नियोजन करून दुष्काळामुळे भकास झालेली गाव समृद्ध करण्यास मदत करणार आहेत.
- पाणी वापराबाबत सामूहिकरीत्या ठरवावे
वॉटर कपमुळे शेकडो गावांनी पाणी साठवण्याची क्षमता वाढविली. परंतु यापैकी अनेक गावांत उसासारखे जास्त पाणी लागणाऱ्या पिकाचे क्षेत्र वाढले. पाण्याचा उपसा वाढल्याने ही गावे पाणी टंचाईने झिजतच राहिली. त्यामुळे गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाण्याचा वापर कसा व्हावे, हे त्यांना सामूहिकरीत्या ठरवावे लागेल.
- शेती अन् समाज समृद्धीची मोहीम
ज्या गावात एकीच्या बाळाने काम केले. त्या गावातच पाणी राहते. हा मंत्र वॉटर कप स्पर्धांनी दिला. यंदा समृद्ध गाव स्पर्धेच्या मृदा व जलसंधारण, जल व्यवस्थापन, वृक्ष, जंगलाची लागवड व वाढ करणे, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधार तयार करणे, कमी पाण्याचा वापर करून पीक पध्दतीमध्ये बदल करणे आदी सहा स्तंभावर काम करतील.गावे सर्व बाबतीत समृद्ध होतील अशा गावांमध्ये झाडे, गवत, माती, पाणी यांची समृद्धी असले त्यासोबत शेतीही समृद्ध असेल. या सर्व प्रयत्नांतून समाज समृद्ध असेल, माणसांचे संबंध जिव्हाळ्याचे असतील, यासाठी १८ महिन्यांची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी मागील वर्षी ज्या गावांनी ३० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यामध्ये त्यामध्ये कोरेगावमधील ४५, खटावमधील ३७ आणि माणमधील ५४ गावांचा समावेश आहे