सातारा : साताऱ्यातील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात सामाजिक संस्थांकडून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या कार्यालयाच्या कामकाजात सुटसुटीतपणा आणून रिक्त पद तातडीने भरले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सातारा कार्यालयात सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची दोन पदे मंजूर आहेत. मात्र येथे एकच पद भरले असून दुसरे रिक्त आहे. या कार्यालयात अनेक पक्षकार, वयोवृद्ध, दिव्यांग हे कामकाजासाठी येत असताना त्यांना विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागते. कार्यालयातील रिक्त पद तातडीने भरून, कामकाजात सुसूत्रता आणावी, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते व माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, महारुद्र तिकुंडे, सुशांत मोरे, पद्माकर सोळवंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गणेश व दुर्गा मंडळ, शिक्षण संस्था, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
अनागोंदी कारभार, साताऱ्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विरोधात धरणे आंदोलन
By सचिन काकडे | Published: December 01, 2023 4:05 PM