विज्ञान प्रसारासाठी विपनेट क्लब हा उपक्रम राबविला जातो. देशभरातील एकूण क्लबपैकी शंभर उत्कृष्ट क्लब विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथील जिओ सायन्स क्लब, ठाण्यातील एकलव्य सायन्स क्लब, पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क आणि ढेबेवाडीतील रयत सायन्स क्लब या मंडळांची निवड झाली आहे.
ढेबेवाडीतील रयत सायन्स क्लब मंडळ गत अनेक वर्षांपासून सामाजिक, पर्यावरण व विज्ञान क्षेत्रात काम करीत आहे. मंडळाकडून अतिशय वेगळ्या पद्धतीने उपक्रम चालवले जातात. त्यामध्ये विज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक कार्यरत आहेत. राष्ट्रीय हरितसेना व विज्ञान छंद मंडळ यांच्या वतीने यापूर्वी दखल घेण्यायोग्य कामगिरी नोंदविण्यात आली आहे. उत्कृष्ट विज्ञान छंद मंडळ म्हणून राज्य विज्ञान संस्थेने गौरव केला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या या विद्यालयात विज्ञान मंडळामार्फत वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी विज्ञान पंधरवडा गेली एकवीस वर्षे चालवला जात आहे. हा देशातील एकमात्र सातत्यपूर्ण उपक्रम चालवणारा क्लब आहे. ओझोन दिन, वनदिन, जलदिन, एड्स दिन यांसारख्या दिनाबरोबर शास्त्रज्ञांचे दिन साजरे केले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन व जटा निर्मूलन यासारख्या सामाजिक बांधिलकीचे उपक्रम व सर्व्हे घेतले जातात. स्वच्छता अभियान, आरोग्य प्रचार गाणी, पथनाट्ये बसविली जातात.
- चौकट
जनजागृती उपक्रमांचे आयोजन
ढेबेवाडीच्या रयत मंडळाचे काम शाळाबाह्य वेळात होताना दिसते. निसर्ग आणि पर्यावरण यासंबंधी विविध प्रकल्प गावोगावी आयोजित केले जातात. त्यातील नदी सफाई मोहीम, गणेशोत्सवातील निर्माल्याचा गांडूळखत प्रकल्प, फटाकेविरोधी अभियान, होळीमधील पोळ्या वाचविणे, छोटी होळी करणे, नैसर्गिक रंग, कागदी व कापडी पिशव्या निर्मिती, वणवा निर्मूलन मोहीम यांसारखे जनजागृतीचे उपक्रम आयोजित केले जातात.
- चौकट
विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी
जखमी प्राणी, पक्षी उपचारासाठी वन विभागाकडे सोपविण्याचे कामही रयत मंडळाकडून करण्यात येते. सापाबाबतचे गैरसमज दूर करणे, जनजागृती करण्याचे कामही विज्ञान मंडळ करते. त्याचबरोबर परिसरातील जैवविविधता टिकवण्यासाठी विविध गावांमध्ये सर्व्हे करून त्याच्या नोंदी केल्या जातात. विद्यालयात रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, पर्जन्यमापन नोंदी विद्यार्थी ठेवतात. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण झाली आहे.
फोटो : ०६केआरडी०२
कॅप्शन : ढेबेवाडी येथील रयत विज्ञान मंडळाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात.