सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाने हाहाकार माजवला असून साताऱ्यात धो-धो सुरू होता. तर पश्चिम भागात दाणादाण उडवून दिली आहे. यामुळे अनेक ठिकाणी भूसख्खलन झाले आहे. वाहून गेलेल्या व अडकलेल्या नागरिकांसाठी शोधकार्य सुरू आहे. तर २४ तासांत नवजाला विक्रमी ७४६ तर कोयनेला ६१० मिलीमीटर पाऊस झाला. कोयनेत १६ टीएमसी पाणीसाठा वाढला असून धरणाचे सर्व ६ दरवाजे १० फूट उचलून ४१ हजार क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पण, चार दिवसांपासून धुवाधार होत आहे. पश्चिम भागाला तर झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर दरडी कोसळत आहेत. पूल वाहून गेले. त्याचबरोबर रस्ते तुटले आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागातील प्रमुख मार्गही बंद आहेत. तर वाई आणि पाटण तालुक्यात भूसख्खलनाच्या घटना घडल्या. यामध्ये काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शोध कार्य सुरू करण्यात आले आहे. तर पुराच्या पाण्यात काही जण वाहून गेले आहेत. सततच्या पावसामुळे मदतकार्यातही अडथळा येत आहे. तरीही जिल्हा प्रशासन सतर्कता ठेवून शक्य तेवढ्या प्रमाणात मदत देण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, कोयना, नवजा, महाबळेश्वर, पाटण, तापोळा, बामणोली भागात धुवाधार पाऊस होत आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत नवजाला ७४६ मिलीमीटर, कोयनेला ६१० आणि महाबळेश्वरला ५५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना धरणात २४ तासांत १६ टीएमसीहून अधिक साठा झाला. सकाळच्या सुमारास धरणात ८२.९८ टीएमसी साठा झाला होता. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळपासून धरणाचे दरवाजे यावर्षी प्रथमच उघडण्यात आले. दुपारी २ च्या सुमारास धरणाचे दरवाजे १० फूट उचलून ४१,६९३ क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू होता. तर पायथा वीजगृहातीलही २१०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. यामुळे धरणातून एकूण ४३,७९३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात जात होता. यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे.
चौकट :
धरणांतील विसर्ग असा (सकाळी आठची आकडेवारी
धोम- ३७७१, कण्हेर- ६७४४, उरमोडी ४३८३, तारळी ११३९४. बलकवडी ६४५८.