आॅनलाईन लोकमततरडगाव, जि. सातारा, दि. ४ : सध्या सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने गावोगावी ढोलकीची थाप अन् घुंगराचा आवाज घुमू लागला आहे. तर तमाशा कलेची पंढरी म्हणून नावारूपास आलेल्या फलटण तालुक्यातील काळज नगरीत विविध तमाशा मंडळाच्या राहुट्या दाखल झाल्याने गावोगावच्या कारभाऱ्यांची पावले या ठिकाणी यात्रेसाठी तमाशा ठरविण्यासाठी पडू लागली आहेत. त्यामुळे परिसर बहरून गेला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसल्याने याचा फटका खेळाची बिदागी ठरविताना बसत आहे. फड चालवताना घेतले जाणारे कर्ज फिटता फिटेना अशी कैफियत अनेकांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना मांडल्याने तमाशा कलावंतांना अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न या निमिताने उपस्थित होत आहे.हे गाव लय न्यारं, इथं थंड गार वारं, ह्याला गरम शिणगार सोसंना... हे लावणी गीत अजूनही कानी पडले की चटकन ह्दयाला स्पर्श करून गेलेला व कलाकारांच्या अभिनयाने सिनेसृष्टीत अजरामर ठरलेला पिंजरा हा सिनेमा डोळ्यासमोर उभा ठाकला जातो. त्याकाळी एखाद्या ठिकाणी तमाशाचा तंबू आलाय असं कळालं तरी शौकीन घरात वेवगळे बहाणे सांगून वेळप्रसंगी ओढ्याला, नदीला असलेले पाणी पार करून तमाशा पाहण्यासाठी दूरवर जात असत. दिवसेंदिवस यात्रांचं स्वरूप मोठं होवून गावोगावी यात्रा होवू लागल्याने तमाशा मंडळे देखील वाढली.
यात्रा हंगामात गाव कारभाऱ्याची गैरसोय होवू नये म्हणून काही ठराविक ठिकाणी कालांतराने तमाशा केंद्रे उभारली गेली. त्यातीलच एक असणारे काळज येथील तमाशा केंद्रात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध नामवंत छोटी मोठी तमाशा मंडळे दाखल झाली आहेत. तर गावच्या यात्रेसाठी तमाशा ठरविण्यासाठी व खेळाच्या सुपाऱ्यांचा अंदाज घेण्यासाठी गर्दी होवू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.छोट्या तमाशा मंडळाची बिदागी ४० ते ५० हजार रुपायांपर्यंत सांगितली जात आहे. मोठ्या नामवंत तमाशा मंडळाचा एका खेळाचा दर हा ७० ते ८० हजार इतका तर दोन खेळाची बिदागी दीड लाखापर्यंत सांगितली जात आहे. शेवटी चचेर्तून गावकारभारी जेमतेम ठराविक रक्कम सांगून खेळ कायम करीत आहेत. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी रकमेच्या बिदागितच गावकरी कार्यक्रमाची मागणी करीत असल्याचे काही कलावंतांनी सांगितले. तर आताची तरुण पिढी तमाशाकडे प्रबोधन नव्हे तर केवळ करमणूक म्हणून पाहत आहेत. तसेच गावोगावी राजकीय दुफळीतून तमाशा कार्यक्रम सुरु असताना त्या ठिकाणी होणाऱ्या वादामुळे व्यत्यय येऊन प्रसंगी कार्यक्रम नाईलाजास्तव बंद पडले जात असल्याची खंत देखील काहींनी व्यक्त केली. सध्या प्रत्येक तमाशा मंडळाच्या थोड्या प्रमाणत खेळाच्या तारखा बुकिंग झाल्या असल्या तरी अक्षय तृतीयापर्यंत बऱ्यापैकी व्यवसाय होईल या आशेवरच सर्वजण आहेत. कारण त्यानंतर राहुट्या येथून निघून जावून मोजकेच मोठे फड काही दिवस केंद्रात राहतात.
यंदा काळज येथील तमाशा केंद्रात पुष्पाताई सोबत कृष्णकांत बरडकर, संजय हिवरे, आशाताई तरडगावकरसह उषाताई सांगवीकर, गीतांजली सातारकर, नांदवळकर तमाशा मंडळ, सारिकाताई हिवरे, सीमाताई कोल्हापूरकरसह तेजश्री इंदापूरकर, ज्योती स्वाती पुरंदावडेकर, अश्विनी शिंदेसह सुनील शिंदे पळसदेव, सागर शिंदेसह प्रियांका शिंदे, हनुमंत देवकाते-पाटील, हिराबाई डोंगरे नगरकर, बुवासाहेब पिंपरीकर, कैलास पिंपरीकरसह शीतल बारामतीकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, सूर्यकांत चंद्रकांत विरळीकर, आनंदकुमार भिसे-पाटील, सुनीताराणी बारामतीकर आदी तमाशा मडळांबरोबर काही आॅर्केष्ट्रा देखील दाखल झाले आहेत. यात्रासाठीच्या बैठका आटोपून गावकारभारी करमणुकीचा कार्यक्रम म्हणून तमाशा ठरविण्यासाठी काळज येथे येत आहेत. मात्र सध्या उन्हाची तीव्रता कमालीची वाढल्याने दुपारच्या रखरखत्या सुमारास तमाशा केंद्र ओस पडलेले दिसते. तर सायंकाळी पाचनंतर ठिकठिकाणचे यात्रा कमिटी सदस्य, पदाधिकारी हे सुपाऱ्याचा अंदाज घेण्यासाठी व खेळ ठरविण्यासाठी राहुट्यमध्ये चर्चा करताना दिसत आहेत. कलावंताच्या वाढत्या मानधनामुळे तमाशा फडातील ५० ते ५५ जणांचा लवाजमा सांभाळणे जिकिरीचे बनले आहे. अशातच नव्याने निर्माण होणाऱ्या अनेक तमाशा मंडळाच्या स्पर्धेत फड टिकवून ठेवण्यासाठी मालक डोक्यावर कजार्चा डोंगर घेवून पुढे प्रवास करीत असतो. यामुळे लोप पावत चाललेली महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने पॅकेजद्वारे सर्व मंडळाना भरघोस मदत करावी. - भानुदास जाधव, मॅनेजर, ज्योती स्वाती तमाशा मंडळ