खालापूर : सातारा जिल्ह्याच्या जावली तालुक्यातील धोंडेवाडी या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी गेलेल्या धोंडे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला. गणेशोत्सव साजरा करून मुंबईला परत येत असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोधिवली जवळ झालेल्या भीषण अपघातात या कुटुंबातील सातजण ठार झाले. मृतांमध्ये चार महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या या दोघांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गणेशोत्सवासाठी गावाला गेलेले धोंडे कुटुंबीय (एमएच ०४ एवाय १८५०) क्वॉलिसने नवी मुंबईत येत असताना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या क्वॉलिसचा टायर फुटला. त्यामुळे क्वॉलिस पलीकडच्या मार्गावर जाऊ न (एमएच ०४ एफ ३२५८) या डम्परवर जाऊ न आदळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. अपघातात धर्मराज दत्तू धोंडे (४५), वेदांत धर्मराज धोंडे (१०), सुनिता धोंडे (४०), अश्विनी धोंडे (१५), शुभम पवार (७), सखुबाई पवार (५०), व चित्रा धोंडे (४०) यांचा मृत्यू झाला तर प्रतिक धोंडे (१६) व पुजा धोंडे (१५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला. त्या ठिकाणी गेल्या महिन्याभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये १० जण ठार झाले आहेत. या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)गावावर शोककळाकुडाळ : जावळी तालुक्यातील धोंडेवाडीत गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी एक्स्प्रेस-वेवरील अपघाताची वार्ता येऊन धडकली अन् गावावर शोककळा पसरली. येथील धर्मराज दत्तू धोंडे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे कांदा-बटाट्याचा व्यवसाय करतात. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त ते सहकुटुंब धोंडेवाडी गावी आले होते. सण साजरा करून स्वत:च्या कारमधून सोमवारी परत निघाले होते. त्यांच्यासमवेत पत्नी लक्ष्मी, चार वर्षांचा मुलगा वेदांत, भावजय, पुतण्या प्रतीक, चुलत बहीण सखुबाई पवार, भाचा शुभम होते. त्यांच्या वाहनावर काळाने घाला घातल्याचे समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली. यामधील मृतांची माहिती उशिरापर्यंत मिळत नसल्याने एकमेकांना फोनाफोनी करून विचारणा केली जात होती. धर्मराज धोंडे यांच्या आई-वडिलांना घेऊन त्यांचे नातेवाईक मुंबईच्या दिशेने रवाना झाले.गरुनाथ साठेलकर यांनी काढले मृतदेहअपघात झाल्यानंतर पोलीस व आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, अपघातानंतर मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यास कुणीही धजावत नव्हते. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी दाखल झालेले पत्रकार व अपघातग्रस्तांना नेहमीच मदत करणारे गुरुनाथ साठेलकर यांनी गाडीतील छिन्नविचिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या सहायाने अपघातग्रस्त कार बाजूला करण्यात आली.
धोंडेवाडीचे सात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2015 10:45 PM