सातारा : सातारा शहर व परिसराला गुरुवारी मान्सूनने जोरदार तडाखा दिला. या पावसाने शहरातील सर्व रस्ते जलमय झाले तर अनेक इमारतींच्या तळघरात पावसाचे पाणी शिरले. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहिले. दरम्यान, खरेदीसाठी गजबजणारी साताऱ्याची बाजारपेठ पावसामुळे दिवसभर ओस पडली होती.
गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील जावळी, महाबळेश्वर व पाटण खोऱ्यात पावसाने धुमाकूळ घातला असताना गुरुवारी सातारा, कऱ्हाड, वाई या तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सातारा शहरातील रस्ते पावसामुळे जलमय झाले होते. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागली. शहरातील सदर बझार, गोडोली, कोडोली येथील सखल भागात पावसाचे पाणी साचले. काही दुकानांमध्ये व घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले.
शहरातील काही इमारतींच्या तळघरातही पावसाने पाणी शिरल्याने नागरिकांना मोटार लावून हे पाणी बाहेर काढावे लागले. पाऊस व वाऱ्यामुळे काही दुकानांचे पत्रे उडून गेले तर काही दुकानांची पडझड झाली. आधीच कोरोनामुळे रोजीरोटी बंद झाली असताना दुकानदारांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. वाऱ्यामुळे शहरातील वीज वाहिन्या तुटल्याने काही भागांचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणकडून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.
(चौकट)
शिंदेवाडीचा पूल पाण्याखाली
परळी खोऱ्यातील करंजे तर्फ परळी आणि चिकणेवाडीसह लावंघरपर्यंत सात गावे जोडणारा शिंदेवाडीचा पूल पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर दोन्ही काठावरील असलेले ग्रामस्थ येथून ये-जा करतात. सातारा औद्योगिक वसाहतीत रात्रपाळी करणाऱ्या कामगारांना या मार्गावरून प्रवास करताना सर्वाधिक धोका आहे.
फोटो : १७ फोटो ०५
(चौकट)
अंगापुरात शेती जलमय
अंगापूर परिसरातील शेतकरी खरिपाच्या पेरणीत व्यस्त होते. काही प्रमाणात भात, कडधान्य, सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांची पेरणी होऊन उगवण होत आहे. अशातच बुधवारी झालेल्या पावसामुळे सर्वच शिवारात पाणीच पाणी साचले. काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर पडून शेतीचे नुकसान झाले आहे. तर सखल भागात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. आता पेरणी रखडणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
(चौकट)
धावडशी परिसरातील पाझर तलाव तुडुंब
सातारा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या किडगाव, धावडशी, नेले, कण्हेर धरण परिसरात गुरुवारी धुवाॅंधार पाऊस झाला. या पावसाने परिसरातील सर्व पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत. हा पाऊस सोयाबीन, भात या पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ज्यांच्या खरिपाच्या पेरण्या बाकी आहेत, त्यांचे चेहरे मात्र चिंतातूर आहेत. कण्हेर धरणाच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे तर वेण्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
(चौकट)
शेंद्रेत शेती-पिकांचे नुकसान
सातारा तालुक्यात शेंद्रे परिसरात बुधवारी रात्रीपासून सुरू असणारा पाऊस गुरुवारीसुद्धा दिवसभर सुरू होता. शेतकऱ्यांकडून पेरणी केलेली सोयाबीन, भुईमूग, भात, इत्यादी पिके या पावसामुळे धोक्यात आली आहेत. मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिले तर पिके कुजून जाण्याची शक्यता आहे. शेंद्रे परिसरात सोयाबीन, भुईमूग पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते.