सातारा : कोरोना महामारी मधुमेह, उच्च रक्तदाब असे पूर्वीचे आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी धोक्याची घंटा घेऊन येत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज अशा रुग्णांना भासते. रेमेडेसिविर इंजेक्शनसुद्धा योग्य पद्धतीने दिले तरच रुग्णांचे प्राण वाचत आहेत. कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्च रक्तदाब सर्वात पुढे आहेत.
कोरोना ॲक्टिव्ह रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचे डेथ ऑडिट केले जाते. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे जे मृत्यू झाले आहेत, त्यामध्ये विशेष करून पूर्वीचे गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यामध्ये गृह अलगीकरणात असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे. विशेषतः तरुणांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त असले, तरी असे रुग्ण विलगीकरणात राहून बरे होत असल्याचेदेखील पुढे येत आहे. मात्र, जे रुग्ण पूर्वीच्या आजाराने ग्रस्त आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात न्यावे लागत आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन देऊन रुग्णाला लवकर बरे करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत असले, तरीही हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने मृत्यूंचे प्रमाणदेखील वाढले आहे. तसेच अनेक रुग्ण पूर्वीच्या आजारांनी ग्रस्त असतानाही कोरोना झाल्यानंतर घरात बसून राहतात, वेळेत डॉक्टरांना दाखवत नाहीत. अशा व्यक्तीला धाप लागल्यास ऑक्सिजनची गरज भासते. या परिस्थितीत मृत्यूमुखी पडल्याचेही समोर येत आहे.
मार्च महिन्यात जिल्ह्यात एकूण मृत्यू : १३८६
इतर कारणांनी झालेले मृत्यू : १३१९
कोरोनामुळे झालेले मृत्यू : ६७
चौकट
अतिजोखमीच्या व्यक्तीने काय करावे?
मधुमेह, अतिरक्तदाब हे आजार पूर्वीपासून असलेल्या व्यक्तीने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येऊ नये. विशेषतः घरामध्ये कोणी कोरोनाबाधित आढळल्यास संबंधित वयस्कर व्यक्तींसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था असावी. विशेषतः अशा लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवलेले चांगले.