कचऱ्याची समस्या गंभीर
सातारा : हद्दवाढीनंतर सातारा पालिकेत आलेल्या शाहूनगर परिसरात कच-याची समस्या गंभीर बनली असून, जाता-येता रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागेत कचरा फेकणा-यांमुळेच येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागातील सफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष असून नागरिकांत याबाबत संताप व्यक्त होत आहे.
जगताप यांना पुरस्कार
सातारा : विशेष शिक्षक गट साधन केंद्र पंचायत समिती जावळी, मेढा येथे कार्यरत विशेष शिक्षिका योगिता जगताप यांना महाराष्ट्र समावेशित शिक्षण संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समता भूषण आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांतील समग्र शिक्षा अभियानांतर्गत काम करणारे विशेष शिक्षक, विषय तज्ज्ञांचा सहभाग होता.
जीवामृतबाबत मार्गदर्शन
सातारा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजमाची येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची कृषीकन्या श्वेता मोरे यांनी दुदुस्करवाडी, ता. जावळी येथे विविध कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतून शेतक-यांना सेंद्रिय शेतीअंतर्गत जीवामृत तयार करून वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. यासाठी मोकाशी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. शिंदे, प्रा. व्ही.व्ही. माने, प्रा. व्ही.टी. बागल यांनी मार्गदर्शन केले.
सोमवारी सभा
सातारा : शाहूपुरी-गेंडामाळ येथील निरामय ज्येष्ठ नागरिक संघाची सर्वसाधारण सभा सोमवार, २७ रोजी दुपारी साडेचार वाजता शाहूपुरीतील सातारा जिल्हा सेवकांच्या सहकारी पतपेढीच्या सभागृहात होणार आहे.
व्याख्यानास प्रतिसाद
सातारा : येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिक्षक दिन कार्यक्रमात झालेल्या इंद्रजित देशमुख यांच्या व्याख्यानास शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षकांनी चिंतन करूनच विद्यार्थी घडविले पाहिजेत, असे विचार देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. बी.डी. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. एम.एल. शिंदे यांनी आभार मानले.