सातारा : बिबट्या किंवा कोणत्याही वन्यजीवाचे दर्शन झाल्यास, ते ठिकाण कोणत्याही माध्यमातून सार्वजनिक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. अशा प्रकारातून शिकारी, तस्कर सावध होतात आणि वन्यजीवांची शिकार वाढते, हे ओळखून दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.जिल्हा व्याघ्रसंरक्षण कक्ष (टायगर सेल) च्या बैठकीत डॉ. देशमुख मार्गदर्शन करीत होते. उपवनसंरक्षक (वन्यजीव) एम. एम. पंडितराव, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक (फिरते पथक) नीता डेरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, रोहन भाटे यांच्यासह वीजवितरण कंपनीचे अधिकारीही बैठकीस उपस्थित होते. जिल्ह्यातील वाघ आणि अन्य वन्यजीवांच्या हालचालींवर देखरेख, माहिती संकलन आणि संवर्धन यासाठी ‘टायगर सेल’ कार्यरत असतो. पोलीस अधीक्षक या कक्षाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. वन्यजीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी या कक्षाची बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. याही बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि सूचनाही करण्यात आल्या. बिबटे मानवी वस्त्यांच्या जवळपास मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि अन्य माध्यमांतून त्यांची छायाचित्रेही फिरू लागली आहेत. मात्र, बिबट्या किंवा अन्य कोणताही वन्यजीव नेमका कोठे दिसला, याची माहिती गुप्त राखणे प्रत्येकाचे कर्तव्य असून, त्याचे ठिकाण सांगितल्यास शिकारी आणि तस्कर सावध होतात. त्यामुळे वन्यजीवाचे वास्तव्य असलेले ठिकाण प्रसिद्ध करणे टाळावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.वन्यजीवांच्या रक्षणार्थ संवेदनशीलता निर्माण करण्याच्या दृष्टीने तलाठी, ग्रामसेवक, मुलकी कर्मचारी, पोलिसांसाठी कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिकार रोखण्यासाठी गावपातळीवर फळी निर्माण होणार आहे. शिकारी, तस्कर किंवा संशयास्पद व्यक्तींबाबत माहितीची देवाणघेवाण तत्परतेने व्हावी, असे निर्देश देण्यात आले. शस्त्र परवान्यातील अनियमितता तपासाव्यात, गावठी बाँबच्या साह्याने शिकार करणाऱ्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. (प्रतिनिधी)तात्पुरते तपासणी नाकेजिल्ह्यातील पर्यटनस्थळी वाढत असलेली गर्दी विचारात घेता वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त सहभागातून पर्यटनाच्या हंगामात तात्पुरते तपासणी नाके उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. कास, ठोसेघर, ओझर्डे धबधबा, क्षेत्र महाबळेश्वर, कोयना अशा ठिकाणी हे तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.
बिबट्या दिसला? ठिकाण सांगू नका!
By admin | Published: February 20, 2015 9:54 PM