सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोनाने थैमान घातले असून, कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक कर्मचारी लढा देत आहे. अशा संकटाच्या काळात सातारा पालिकेने कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला. पालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना येत्या मे महिन्यात लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाचा हप्ता दिला जाणार आहे.
पुढील महिन्यात सर्व कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकापोटी १ कोटी ६० लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेप्रमाणे सातारा पालिकेने नगरविकास विभागाकडे सहाय्यक अनुदानासाठी पाठपुरावा केला होता. नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सहाय्यक अनुदानाचे समन्वयक चर्चेनंतर प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला वित्त विभागाने हिरवा कंदील दिला.
सहाय्यक अनुदानापोटी सातारा पालिकेला एकूण १ कोटी ६८ लाख ३ हजार ९१८ रुपये प्राप्त झाले. यामधून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ८२ लाख ६२ हजार २१० रुपये दिले जाणार आहेत. तसेच रजा रोखीकरणाच्या कामासाठी २६ लाख ८१ हजार १८२ रुपये उपलब्ध झाले आहेत. पालिकेच्या आस्थापनेवर सक्रिय असलेल्या ४५५ कर्मचाऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपये सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी मे महिन्यात देण्याचे नियोजन करण्यात आले. संकट काळात सुखद धक्का दिल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे अभिनंदन केले.