सातारा - कोण इकडं जाणार कोण तिकडं जाणार याच्याशिवाय सध्या काहीच चर्चा नाही. सध्याचे वातावरण पाहता राजकारणापासून अलिप्त रहावे असे वाटत असल्याचे मत राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. संभाजी भिडे यांनी उदयनराजेंची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, सध्या खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राजकारणाच्या पातळीवर सर्वचजण अस्वस्थ आहेत. कोणताही निर्णय घेतला तरी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वजण काळजीपूर्वक पाऊले टाकत आहेत. संभाजी भिडे आणि आमचे खूप पूर्वीपासून सख्य आहे आणि मला कोणीही कधीही भेटू शकतो. त्यामुळे त्यांनीही भेट घेतली. यामध्ये सध्याच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नसून ही भेट केवळ औपचारिक होती असेही उदयनराजे म्हणाले.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा मतदारसंघातून उदयनराजे सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. उदयनराजे यांना पाडण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने यावेळी संपूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे उदयनराजेंच्या पराभवाची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, सातारकरांनी उदयनराजे आणि राष्ट्रवादीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. सलग चार लोकसभा निवडणुकीपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. तर उदयनराजे २००९ आणि २०१४ मध्ये या मतदार संघातून निवडून आले आहेत.
उदयनराजे यांच्या जलमंदिर या निवासस्थानी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी भेट घेतली. त्यामुळे उदयनराजे यांची भाजपची प्रवेशाची तयारी पूर्ण झाली, अशी चर्चा साताऱ्यात सुरू आहे. या संदर्भात उदयनराजे यांना विचारले असते, ते म्हणाले की, जलमंदिर हे काही माझ्या एकट्याचे घर नाही. मला भेटण्यासाठी कोणीही येऊ शकते. भिडे गुरुजी माझ्या घरातले आहेत. ते मला भेटायला येणारच, असंही ते म्हणाले.
मागील काही दिवसांत राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. आतापर्यंत ३० हून अधिक राष्ट्रवादीचे नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले आहेत. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंहराजे देखील भाजपमध्ये सामील झाले. तर रामराजे निंबाळकरही भाजपच्याच वाटेवर असल्याची चर्चा आहे.