सातारा : मालमत्ता व पाणीकरापोटी सातारा पालिकेला तब्बल ४४ कोटी ६२ लाखांचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. यापैकी आजअखेर केवळ ९ कोटी ३८ लाख ६६ हजारांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. नवीन आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी सवा दोन महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत पालिका ३५ कोटींच्या थकबाकीचा अवघड पेपर कसा सोडवणार? हा प्रश्न आहे.
पालिकेच्या हद्दीत तब्बल ३५ हजार ३०० मिळकती आहेत. पालिकेकडून निवासी मिळकतींची पाच रुपये, तर व्यावसायिक मिळकतींची दहा रुपये स्क्वेअर फुटाप्रमाणे कर आकारणी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही वसुली विभागाने जवळपास सर्वच थकबाकीदारांना नोटीस बजावून कर भरण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी पालिकेत येऊन कर भरणा सुरू केला आहे. मात्र, कर भरणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने पालिकेच्या तिजोरीत दररोज पाच ते सहा लाखांचा महसूल जमा होत आहे. लॉकडाऊनपूर्वी हाच आकडा १८ ते १९ लाखांच्या घरात होता.
पालिकेच्या तिजोरीत आजअखेर घरपट्टीचे १ कोटी ९८ लाख ६६ हजार ३५०, तर पाणीकराचे ७ कोटी ४० लाख रुपये जमा झाले आहेत. एकूण थकबाकी तब्बल ४४ कोटी ६२ लाख रुपये असून, यापैकी केवळ ९ कोटी ३८ लाख ६६ हजार ३५० रुपये आजवर वसूल झाले आहेत. वसुली मोहीम सुरू असली तरी कमी कालावधीत पालिकेला ३५ कोटी २४ लाखांचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
(चौकट)
कारवाईची गरज
पालिकेच्या तिजोरीत दररोज ५ ते ६ लाखांचा कर जमा होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास मार्चअखेरपर्यंत तिजोरीत आणखीन साडेतीन ते चार कोटींची भर पडू शकते. त्यामुळे ३५ कोटींच्या थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेला अधिक प्रभावीपणे काम करावे लागणार आहे.
फोटो : सातारा पालिका