सातारा : आघाडीच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांची गेल्या वीस वर्षांत फरफट झाली आहे. परंतु, सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे. महाविकास आघाडीतील घटक म्हणून चर्चेला बसल्यावर पक्षाची भुमिका मांडणार असे प्रतिपादन मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी केले. काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंगनाना चव्हाण पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश सचिव ॲड. उदय पाटील-उंडाळकर, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, प्रदेश सचिव धनश्री महाडिक, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाई जगताप म्हणाले, सातारा लोकसभेच्या आढावा घेत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आघाडीच्या राजकारणात तडजोड करताना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. परंतु, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. आम्ही महाविकास आघाडीतच असून एकत्रच लढणार आहोत. पण काँग्रेस म्हणूनही आमचेही अस्तित्व आहे. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भुमिकांही मांडणार असल्याचे जगताप म्हणाले. जिल्ह्यातील लोकसभेची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. परंतु, त्यावेळी खा. शरद पवार यांची राष्ट्रवादी होती. पण आजच्या घडीला खुद्द खासदार श्रीनिवास पाटील हेही ते नेमके कोणत्या राष्ट्रवादीत आहे, हे सांगू शकणार नसल्याचे सांगत सातारा लाेकसभेच्या उमेदवार निवडीवेळी काँग्रेसचाही दावा राहणार असल्याचे संकेत दिले.
मणिपूर अत्याचाराबाबत स्मृती इराणी गप्पकाँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांच्याबाबत स्मृती इराणी यांनी केलेले वक्तव्य लज्जास्पद आहे. मणिपूर येथे महिलांची धिंड काढली गेली, अत्याचार झाले. महिला क्रीडापटूंवर पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री अन्याय करतो, याबाबत चित्रा वाघ, स्मृती इराणी आदींनी ब्र काढला नाही. अशावेळी छप्पन इंची छाती काय करते असा सवाल जगताप यांनी करून सोशल मिडियावर मोदींची खुशमस्करी टीम केवळ त्यांना खुश करण्याचे काम करते, देशाच्या स्थितीचे काही पडले नसल्याची टिका केली.