फलटण (सातारा) : फलटण प्रांत कार्यालयाबाहेर सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत विषप्राशन केले. यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस जखमी झाले.
दरम्यान, आगवणे यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दगडफेकीप्रकरणी नव्वदहून अधिक जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, दिगंबर आगवणे यांनी विविध मागण्यांसाठी सहा दिवसांपासून प्रांत कार्यालयाबाहेत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या दोन मागण्यांबाबत पोलिसांनी सकारात्मकता दर्शविली होती. मात्र लोणंद पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हस्तक्षेप करीत दबावापोटी खोटा गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप करीत रामराजे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ते ठाम होते. मात्र, असा गुन्हा दाखल करता येत नाही, असे पोलीस सांगत होते.
उपोषणाच्या सहाव्या दिवशी आगवणे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची पोलीस वारंवार विनंती करीत होते. ‘फलटणला गुरुवारी रात्री बंदोबस्त वाढविल्याने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत,’ असा आरोप करीत मध्यरात्री एकच्या सुमारास चिठ्ठी लिहून आगवणे यांनी विषारी औषध प्राशन केले.
त्यांना तत्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक झाल्याने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगवणे यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे समजताच संतप्त कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात आले. येथे पोलिसांबरोबर वादावादी सुरू झाली. त्यातच काहींनी दगड फेकल्याने पळापळ सुरू झाली. या दगडफेकीत पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक दळवी, पोलीस कॉन्स्टेबल मुठे, पोलीस कॉन्स्टेबल पिचड हे जखमी झाले. आगवणे समर्थकही जखमीही झाले असून, समर्थकांच्या अनेक गाड्यांचेही नुकसान झाले. जवळपास नव्वदहून अधिक जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला असून, गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी फलटणला भेट दिली.