सचिन काकडे
सातारा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तलाव परिसरात जलरोधी खंदकाचे (पाया) काम करण्यात आले. यासाठी आतापर्यंत तब्बल ७० हजार घनमीटर मातीचे खोदाकाम करण्यात आले असून, खंदक भरण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.कास ही सातारा शहराची सर्वात जुनी पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शहराला दररोज ५.५० लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाण्याची दैनंंदिन गरज व वाढती मागणी पाहता गेल्या अनेक वर्षांपासून धरणाची उंची वाढविण्याची मागणी केली जात होती. अखेर उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला शासनाचा हिरवा कंदील मिळताच धरण परिसरात उंची वाढविण्याच्या कामास प्रारंभ झाला.उरमोडी नदीच्या उजव्या बाजूच्या तीरावर साखळी क्रमांक १८० ते ३४० यामध्ये जलरोधी खंदकाचं खोदकाम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच भराव टाकून हे खंदक भरण्याचं काम प्रगतीपथावर आहे. यासाठी आतापर्यंत तब्बल ७० हजार घनमीटर मातीचे खोदकाम केले आहे. आठ पोकलेन, १२ डंपर, दोन रोलर, दोन टॅँकर तसेच १०० कर्मचाºयांच्या मदतीने हे काम रात्रंदिवस सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी कास धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.२५ मे नंतर काम बंदपावसाची शक्यता गृहित धरून कास धरण परिसरात सुरू असलेले काम २५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. पावसाळा संपेपर्यंत हे काम पूर्णपणे बंद राहणार आहे. यानंतर आॅक्टोबरमध्ये पुन्हा कामास प्रारंभ होणार आहे.खंदक म्हणजे काय..धरणाचा पाया बांधण्यासाठी ठराविक अंतरापर्यंत खोदकाम केले जाते. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पाझरून वाया जाऊ नये, यासाठी पाया भरताना विशिष्ट प्रकारच्या मातीचा भराव टाकला जातो. पाया खोदणे व भरणे या प्रक्रियेलाच जलरोधी खंदक असे म्हटले जाते.