आॅनलाईन लोकमत
वाठार स्टेशन : कायम दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बिचुकले गावाने काळाची पावले ओळखून ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हे आमचे लक्ष्य,ह्ण असा नारा देत गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गाव परिसरात जलसंधारण, ग्रामस्वछता व दुष्काळ निवारणाचे काम हाती घेतले आहे. याचा डंका आता सर्वत्र वाजू लागला आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील डॉ. सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान ग्रुप या नावाने संस्था स्थापन करण्यात आली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून गावातील शेकडो युवक, ग्रामस्थ आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी एक दिवस श्रमदान करत आहेत. अशामुळेच याची दखल घेण्यात आल्याने गुढी पाडव्यादिवशी या गावच्या जलसंधारण कामाची यशोगाथा संपूर्ण राज्यभर दिसणार आहे.
चहू बाजूने विस्तारलेले डोंगर आणि या मधोमध असलेले बिचुकले हे साधारण दोन ते तीन हजार लोकसंख्येच गाव. गावाशेजारी पूर्व व दक्षिण बाजूला डोंगर तर पश्चिमेला देऊर गाव अशा निसर्गसानिध्यात असलेल्या या गावाने कायमच्या दुष्काळावर मात करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या तीनवर्षांपासून हे गाव दुष्काळ निवारणासाठी झटू लागले. गाव परिसरात असलेल्या डोंगरावर पाणी अडवणे. तसेच वृक्षारोपण करणे वाहून जाणारे पाणी अडवणे व जिरवण्याचे काम या गावाने सुरू ठेवले आहे.
या गावातील युवक, ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना आज अपेक्षित यशसुद्धा मिळालेय. बिचुकले गाव परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असली तरी या गावात मात्र अद्याप कोणताही टँकर लावण्याची आवश्यकता भासत नाही. गावचा दुष्काळ हटवण्यासाठी आता हे सर्वच गावकरी मनापासून कामाला लागले आहेत. नुकतीच ग्रामसभाही बोलावण्यात आली होती. यासाठी युवकांपासून सर्वच ग्रामस्थ व महिलांनी या लढ्यात एकत्र येऊन गावाचा चेहरा बदलण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील या गावाचा आदर्श शेजारील गावांनी घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर) बक्षीस मिळविण्यापेक्षा काम महत्त्वाचे...गतवर्षी महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी अभिनेता अमीर खान, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली. केवळ शासकीय मदतीवर किंवा निसर्गावर अवलंबून न राहता लोकसहभागाच्या आणि श्रमदानाच्या माध्यमातून जनजागृती व जलजागृती करणे हे पाणी फाउंडेशनचे मुख्य ध्येय असल्याने त्यांनी कोरेगावसह महाराष्ट्रातील तीन तालुके यासाठी निवडले. यामध्ये बिचुकले गाव सहभागी झाले. केवळ बक्षीस मिळवण्यापेक्षा संघटितपणे या गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला. याचा मोठा फायदा आज हे गाव अनुभवत आहे. यापुढे कुठेही न थांबता आता ही चळवळ या पुढेही सुरूच ठेवण्याची भूमिका या गावकऱ्यांनी घेतली आहे.