दहिवडी : पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, सहायक निबंधक, मोजणी ऑफिस स्टॅम्पवेंडरजवळ असल्यामुळे येथे वर्दळ असते. अशा वेळी अचानक प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी या परिसराला भेट दिली. गर्दी दिसली त्यांनी थेट मुद्रांक विक्रेत्यांची कार्यालय बंद केले. तसेच परिसरात आलेल्या ७१ जणांची जागेवर रॅपिड टेस्ट केली. स्वतः हातात दंडुका घेऊन चक्क रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली. त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांना गर्दी होऊ न देण्याचे आवाहन केले.
सगळीकडे कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असताना माणमध्ये अद्यापही कोरोना आटोक्यात येत नाही. अनेक गावांत नव्याने बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे बेफिकीर वागणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातील लोकांनी दहिवडीत येऊन गर्दी न करण्याचे आवाहन केले.
दहिवडीत आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवरही यापुढे दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना नगरपालिकेला दिल्या आहेत. या वेळी दहिवडीचे सहायक निबंधक विजया बाबर, पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
दहिवडी येथे तहसील कार्यालय परिसरात प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी मुद्रांक विक्रेत्यांचे कार्यालय बंद करुन सक्तीने तपासण्या केल्या. (छाया : नवनाथ जगदाळे)