कोरेगाव : राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा कोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. गावपातळीवर पक्षविरहित स्थानिक आघाड्यांमध्ये किंबहुना पॅनलमध्ये थेट लढत आहे, तर तालुक्यातील ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
कोरेगाव तालुक्यातील ५६ पैकी ७ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्ण, तर १२ ची अंशत: बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत तब्बल ३४७ जणांनी माघार घेतली. ४९ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढत होत आहे. ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. नागेवाडी, चिलेवाडी, तडवळे संमत, वाघोली, कोलवडी, होलेवाडी, भिवडी व बोधेवाडी (चिमणगाव) या ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत: बिनविरोध झाली आहे.
सातारा आणि माढा, अशा दोन लोकसभा, तर कोरेगावसह कराड उत्तर आणि फलटण (राखीव), अशा तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये कोरेगाव तालुका विभागला आहे. खासदार श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले व रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, महेश शिंदे, दीपक चव्हाण यांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष केंद्रित केले आहे.
कोरेगाव मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सरळ-सरळ लढत होत आहे. याठिकाणी पक्ष म्हणून कोणीही निवडणूक रिंगणात नाहीत. कऱ्हाड उत्तरमध्ये मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांचा गट आमने-सामने आहे. फलटण राखीव मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात शिवसेना, अशी सरळ-सरळ लढत होत आहे.
चौकट :
आघाडी धर्म नाही
बुधवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता झाली. जवळपास प्रत्येक गावामध्ये दोन्ही आघाड्यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. प्रत्येक गावास भेट देण्याचा आमदारांनी प्रयत्न केला आहे. एकंदरीत कोरेगाव तालुक्यात आघाडी धर्म पाळला जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
...................................................................