दिलीप पाडळेपाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रोबेरीच्या चालू वर्षाच्या हंगामाकरिता प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग काही अंशी सुरू झाली. मात्र यावर्षी कमी पर्जन्यमनामुळे रोपे तयार होण्यास अवधी लागत असल्याने संपूर्ण तालुक्यात पूर्ण लागवड होण्यास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पहिल्या लागवडीच्या स्ट्रॉबेरीची लज्जतदार गोड आंबट चव प्रत्यक्ष पर्यटकांना दीपावली दरम्यान नोव्हेंबरमध्ये चाखता येणार आहे.महाबळेश्वर तालुका स्ट्रोबेरी हब म्हणून ओळखला जातो. स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. येथील वातावरण मुख्यतः स्ट्रॉबेरीपिकासाठी पोषक आहे. स्टोब्रेरीची लागवड करण्याकरिता लागणारी मुख्य रोपे परदेशातून आयात केली जातात. त्याची पुनर्लागवड करून त्यामधून लागणीसाठी हवी असलेली रोपांची निर्मिती करून पुन्हा नव्याने रोप निर्मित केली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष सुप्टेंबर महिन्यात स्ट्रोब्रेरीच्या रोपांची लागवड केली जाऊन, दीड महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू होते, ते मार्च ते एप्रिल पर्यंत उत्पन्न घेतले जाते.स्ट्रॉबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर ठराविक ठिकाणीच होत असे, पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. या फळातील पोषणमूल्ये आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली मागणी यामुळे भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरीच्या फळामध्ये कार्बोहायड्रेटस जीवनसत्त्व ‘क’, ‘ब’ आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद इत्यादी अन्नघटक भरपूर प्रमाणात असतात.
तालुक्यात पूर्ण क्षमतेने स्ट्रॉबेरी लागवड होण्यास अजून दहा ते बारा दिवसांचा अवधी आहे. या वर्षी पर्जन्यमान कमी असल्याने रोपे तयार होण्यास वेळ लागत आहे. त्याचा परिणाम उशिरा लागवड होण्यास झाला आहे. - किसन शेठ भिलारे अध्यक्ष, महाबळेश्वर सहकारी फळे फुले भाजीपाला खरेदी विक्री संस्था
स्ट्रॉबेरी हे आमच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्तोत्र आहे. नुकतीच पाच हजार विंन्टर जातीच्या रोपांची लागवड केली आहे. स्ट्रॉबेरीचा प्रथम भार दीड महिन्यात येऊन दीपावली दरम्यान चांगला दर मिळण्याची अपेक्षा असते. या करीता लगबग चालू आहे. - योगेश बावळेकर, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी. पाचगणी.