कऱ्हाड : कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून दोन फायनान्स कंपन्यांनी कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली महिलेची ४ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबतची फिर्याद सुरेखा एकनाथ चव्हाण (वय ४५, रा. मोरया कॉम्प्लेक्स, कऱ्हाड -ढेबेवाडी रस्त्यालगत, मलकापूर) यांनी शहर पोलिसांत दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथे मोरया कॉम्प्लेक्समध्ये सुरेखा चव्हाण या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे त्या कर्ज देणाऱ्या संस्थांच्या शोधात होत्या.
त्यातच मुद्रा फायनान्स कंपनीकडून १ ते ८० लाख रुपयांपर्यंतचे सर्व प्रकारचे कर्ज दोन टक्के व्याजदराने मिळेल, अशी जाहिरात सुरेखा चव्हाण यांना १७ नोव्हेंबर रोजी वाचनात आली. तसेच आॅल इंडिया फायनान्स कंपनीचेही दोन टक्के दराने कर्ज मिळेल, अशी आणखी एक जाहिरात त्यांच्या निदर्शनास आली.
सुरेखा चव्हाण यांनी संबंधित जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता समोरील व्यक्तीने आवश्यक कर्जाची रक्कम व ओळखपत्र व्हॉटस्अॅपवर पाठवण्यास सांगितले. त्यासाठी त्या व्यक्तीने एक मोबाईल क्रमांकही दिला. त्यानंतर मुद्रा फायनान्स कंपनी ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करत असल्याचे चव्हाण यांना सांगण्यात आले. तर आॅल इंडिया फायनान्स कंपनीने ५ लाख रुपये कर्ज मंजूर करत असल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले.कर्जासाठी चव्हाण यांनी सुमारे चार लाख एवढी रक्कम संबंधितांच्या खात्यावर भरली. मात्र, कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.चार लाख रुपये दोन खात्यांवर भरलेमुद्रा फायनान्स कंपनीच्या कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली सुरेखा चव्हाण यांना वेळोवेळी पैशाची मागणी केली. चव्हाण यांनी १७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर यादरम्यान ३ लाख ५९ हजार रुपये संबंधित मुद्रा फायनान्स कंपनीने सांगितलेल्या खात्यावर पाठवले. तसेच आॅल इंडिया फायनान्स कंपनीच्या मंजित कुमार याच्या खात्यावर ५२ हजार रुपये चव्हाण यांनी पाठवले.