वडूज : वास्तविक पाहता कोरोना बाधितांवर जे उपचार सुरू आहेत, ते केवळ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि आधारासाठी औषधोपचार होय. मात्र, काही बाधित रुग्णांना इतर आजाराने ग्रासल्यामुळे व भीतीपोटी खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत आहेत.
सध्या कोरोना संसर्गजन्य तपासण्या कमी होत असल्याने रुग्ण संख्येत घट दिसत आहे. मात्र, जेवढ्या तपासण्या होत आहेत, त्यापैकी पन्नास टक्के नागरिक पाॅझिटिव्ह येत असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे. यातील इतर आजार असलेले रुग्ण भीतीपोटी खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत आहेत, तर इतर आजार नसलेले आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे, असेच बाधित शासकीय सेंटरला उपचार घेत आहेत. खासगी दवाखान्यात न जाण्याची अनेक कारणे असून, खटाव तालुक्यात याबाबत परिस्थिती थोडी वेगळी आहे. बाधित रुग्णांचा शासकीय यंत्रणेवर विश्वास जादा असल्याने व खासगी दवाखान्याची फी परवडणारी नसल्याने बहुतांश रुग्ण शासकीय कोरोना व कोविड सेंटरमध्येच उपचार घेताना आढळून येत आहेत. सध्या खटाव तालुक्यात आजअखेर १,११,४३८ रुग्ण कोरोनाने बाधित होते. यापैकी ९,९८६ रुग्ण बरे झालेले आहेत. यामध्ये ३१०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या १,१४६ बाधित रुग्ण ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. ९५४ बाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, ३४६ बाधित रुग्ण पुसेगाव- ४७, पडळ - २५ व खटाव - ८० येथे कोरोना केअर सेंटरला उपचार घेत आहेत, तर १३४ बाधित रुग्ण मायणी, ३० बाधित रुग्ण औंध व ३० बाधित रुग्ण वडूज येथील कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. उर्वरित ४६ बाधित रुग्ण वडूज, सातारा, कोरेगाव व कर्हाड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
(चौकट)
नातेवाईकांचे अतोनात हाल...
जिल्ह्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, खटाव तालुक्यातही बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या कोरोना संसर्ग आजाराबरोबरीने बुरशीच्या आजाराची लक्षणे दिसल्याने अनेक बाधित रुग्ण भयभीत झालेले आहेत. या उपचारासाठी त्यांचा कल खासगी दवाखान्याकडे वाढत आहे. परंतु खासगी दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच डिपाॅझिटची भरमसाठ रक्कम आकारली जात असल्याने नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत.
--------------