पेट्री, 5 : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात सोमवारी सकाळी रस्ता खचल्या कारणाने संध्याकाळपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु ‘लाईट व्हेईकल’ या मार्गावरून जात असली तरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय जड वाहने व एसटी बसेसची या मार्गावरून वाहतूक सुरू होणार नाही. यामुळे सातारा-कास-बामणोली मार्गावर अनिश्चित वेळेपर्यंत एसटी बसचे दर्शन दुर्मीळ राहणार आहे. तसेच यामुळे ऐन परीक्षेत एसटीअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना पासअभावी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
शहराच्या पश्चिमेकडे ग्रामीण भागात दळणवळण व वाहतुकीसाठी एसटी बस हेच मुख्य साधन आहे. परंतु या मार्गावर एसटी बसची चाके थांबल्याने बसच्या बामणोली, तेटली, गोगवे, वांजळवाडी, चिकणवाडी या गावांच्या मिळून दिवसभराच्या एकूण पूर्ण आठ फेºया रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे.
या भागातील बहुतांशी लोक रोजगारानिमित्त पुणे-मुंबई येथे असल्याने दिवाळीसह सणासुदीला आपल्या मूळगावी काही दिवस सुटीवर येतात. परंतु ऐन दिवाळी तोंडासमोर आली असताना घाटातील रस्ता खचल्याने एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांना अन्य पर्याय शोधावे लागत आहेत.
बसेस बंद असल्याने नोकरदार वर्गाची धांदल उडत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दूर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. तसेच शहराच्या पश्चिमेकडील यवतेश्वर, अनावळे, पेट्री, कास, बामणोलीसह आसपासच्या गावांतील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी साताºयाला जातात.
यवतेश्वर, सांबरवाडी, कास परिसर येथून पेट्री हायस्कूलला व कास, फळणी येथून अंधारी हायस्कूलला तसेच बामणोली, तेटली येथून बामणोली व आपटी हायस्कूलला तसेच कुसुंबी मुरा हायस्कूलला येणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच बहुतांशी विद्यार्थ्यांचे पास असून, एसटीअभावी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
दरम्यान, पास असताना देखील इतर वाहनांना पैसे देत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करत किमान मिनी बस तरी सुरू करण्याची मागणी पालक, विद्यार्थी, ग्रामस्थांतून होत आहे.प्राथमिक स्वरुपाच्या कामाला प्रारंभ... सोमवारी सकाळी रस्ता खचल्याची घटना यवतेश्वर घाटात घडली. सध्या कास-बामणोलीकडे जाण्यासाठी ‘लाईट व्हेईकल’ची एकेरी वाहतूक जरी सुरू असली तरी कित्येक पर्यटक मनात भीती धरून या घटनास्थळाच्या अलीकडे उतरून शंभर मीटर अंतर चालून जाताना दिसत आहेत. दरम्यान, या घाटाचे प्राथमिक स्वरूपात काम सुरू झाले आहे.